अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया मंगळवार (दि. 13) पासून सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासमोर सेवा ज्येष्ठतेनुसार रिक्त असणार्या जागांवर समुपदेशनाने आधी प्रशासकीय व त्यानंतर विनंती बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. पहिल्या दिवशी चार विभागातील कर्मचार्यांच्या 5 प्रशासकीय तर 19 विनंती बदल्या करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी सकाळपासून कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्यासह बदल्या होणार्या विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. सुरुवातीला कृषी विभागातील विस्तार अधिकारी कृषी या पाच कर्मचार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. या ठिकाणी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेले कर्मचारी नसल्याने प्रशासकीय बदल्या न करता केवळ विनंती बदल्यांची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर महिला बालकल्याण विभागातील पर्यवेक्षकांच्या 4 प्रशासकीय व 8 विनंती, पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या 2 विनंती तर प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी या पदावरील 1 कर्मचारीची प्रशासकीय तर 5विनंती बदल्या करण्यात आल्या.
मागील वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यंदा, मात्र ग्रामविकास विभागाच्या सूचनानुसार सामान्य प्रशासन विभाग सेवा जेष्ठतेनुसार रिक्त असणार्या जागा बदली पात्र कर्मचार्यांना दाखवून समुपदेशनाने बदलीची प्रक्रिया पार पाडत आहे. आज उद्या विविध विभागाच्या कर्मचार्यांची प्रशासकीय आणि विनंती बदल्या होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.