धुळे dhule। प्रतिनिधी
जय अहिराणी… जय खान्देशच्या… गजरामध्ये संपूर्ण शहर दुमदुमून निघाले. खान्देशातील सण, उत्सव, परंपरांचे देखाव्यासोबत निघालेल्या दिंडीमुळे शहराचे वातावरण अहिराणीमय झाले. आजपासून धुळे येथे सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य सुरू झाले. संमेलनात अहिराणी सारस्वतांचा (Ahirani Sarasvatsana) कुंभमेळा (Kumbhameya)सुरू झाला असून या संमेलनाला खान्देशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून नामवंत अहिराणी साहित्यिकांनी हजेरी लावली आहे.
आज दि.21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. माजी मंत्री रोहिदास पाटील, सौ. लताताई रोहिदास पाटील, आ. कुणाल पाटील आणि संमेलन अध्यक्ष रमेश बोरसे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. त्यानंतर अहिराणी दिंडीच्या पालखीची धुरा आ. कुणाल पाटील यांनी खांद्यावर घेत दिंडी मार्गस्थ केली.
आ. कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे धुळ्यात सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन आज दि. 21 जानेवारी रोजी सुरू झाले. दोन दिवस चालणारे अहिराणी साहित्य संमेलन स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी, हिरे भवन येथे संपन्न होत आहे. आज सकाळी दहा वाजता गांधी पुतळ्यापासून अहिराणीच्या पालखीचे व ग्रंथाचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. दिंडीमध्ये खान्देशाची विविध संस्कृती दाखवणार्या सण, उत्सवांचे सजीव देखावे सादर करण्यात आले होते. त्यामुळे धुळे शहरांमध्ये आज संपूर्ण खान्देश संस्कृती अवतरल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला.
दिंडी महात्मा गांधी पुतळा, फुलवाला चौक, कराचीवाला खुंट, जमनालाल बजाज रोड मार्गे बाराफत्तर चौकाकडून हिरे भवनात खान्देशी वाजंत्री वाजत गाजत पोहोचली.