Friday, May 3, 2024
Homeनगरनगर-कोपरगाव महामार्गावर साडेआठ कोटींचा धुरळा

नगर-कोपरगाव महामार्गावर साडेआठ कोटींचा धुरळा

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)

प्रवाशांसाठी कायमच डोकेदुखी ठरलेला नगर-कोपरगाव महामार्गाच्या दुरूस्तीसाठी साडेआठ कोटींचा खर्च करूनही तात्पुरत्या मलमपट्टीमुळे कूचकामी झालेले काम प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. कोट्यवधीचा निधी खर्च होऊनही रस्त्यावरील खड्डे व उडणार्‍या धुळीमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नगर-कोपरगाव रस्त्याच्या दुरूस्तीचे रामायण संपता संपत नसल्याचे चित्र आहे. सरकारने या दुरूस्तीसाठी 2005-06 ते 2014 या काळात जवळपास सव्वाशे कोटी खासगीकरणातून खर्च केले. टोलनाका असूनही संबंधित कंपनीने रस्ता विहीत मुदतीत दुरुस्त न केल्याने टोल वसुली बंद झाली.

त्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे गेला. या माध्यमातून प्रथम 400 कोटींचा निधी या रस्त्यासाठी आरक्षीत करण्यात आला. मात्र काम मध्यावर सोडून कंत्राटदार पळाल्यामुळे रस्त्याचे अर्धवट काम ठप्प झाले. खोदलेल्या साईटपट्ट्या व रस्त्यावरील खड्डे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनले. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दरम्यानच्या काळात रस्ता दुरूस्तीसाठी जवळपास साडे आठ कोटींचा निधी दिला.

पावसाळ्याचे दिवस व ठरलेले कायमचेच कंत्राटदार यांच्या निकृष्ट कामामुळे निधी संपूनही रस्त्याची दुर्दशा संपली नाही. दरम्यानच्या काळात साडेआठ कोटींचा निधी संपला. मात्र रस्त्याची दुर्दशा संपण्याचे नाव घेईना. अपूर्ण काम, नाममात्र डागडुजी, उघडे खड्डे व जड वाहतूक यामुळे या रस्त्यावर नुसता धुळीचा धुराळा उडत आहे. अनेक अपघात यामुळे घडत असल्यामुळे निष्पाप नागरिक व प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे.

2004 मध्ये जागतिक बँकेकङे असणार्‍या या रस्त्याचा खर्च सव्वाशे कोटींचा होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रथम 400 कोटी व त्यानंतर आता 800 कोटींची टेंडर प्रक्रिया राबविली आहे. मात्र वर्षानुवर्षे कोट्यवधीचा खर्च होत असूनही या रस्त्याची दुर्दशा संपत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून केवळ दुरुस्तीचा फार्स करून जवळपास साडेआठ कोटींचा निधी लाटणार्‍या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या