Saturday, May 18, 2024
Homeनगर27 पोलीस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत

27 पोलीस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पोलीस ठाण्यात अधिकार्‍यांची आवश्यकता असतानाही तब्बल 27 पोलीस अधिकारी नियंत्रण कक्षात राखीव आहे. त्यांना अद्यापही पोलीस ठाण्यात नियुक्त्या न मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यांच्या बदली बाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला कधी काढणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

- Advertisement -

पोलीस महासंचालक व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केलेल्या बदल्यामध्ये जिल्ह्यात बदलून आलेल्या पोलीस अधिकार्‍यांना अद्यापही पोलीस ठाणे मिळालेले नाही. तसेच चौकशी व इतर कारणास्तव काही अधिकार्‍यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आलेली आहे. यामुळे पहिल्यांदाच नियंत्रण कक्षात मोठ्या प्रमाणात अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र जिल्हा पोलीस दलात निर्माण झाले आहे. सध्या नियंत्रण कक्षात 10 पोलीस निरीक्षक, आठ सहा. निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक व पाच परि. पोलीस उपनिरीक्षक अशा एकुण 27 पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने गुन्हेगारीचे प्रमाणही मोठे आहे. जिल्ह्याची कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी 33 पोलीस ठाणे कार्यरत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक, सहा. निरीक्षक यांना नियुक्ती देण्यात येते. त्यांच्या मदतीला प्रत्येक पोलीस ठाण्यात सहा. निरीक्षक, उपनिरीक्षक दिले जातात. जिल्ह्यात दररोजच खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा व जातीय तणावाच्या घटना वारंवार घडत असून नियंत्रण कक्षात असलेल्या पोलीस अधिकार्‍यांची गरज पोलीस ठाण्यात असतानाही अधीक्षक ओला यांच्याकडून त्या अधिकार्‍यांच्या बदलीबाबत आदेश निघत नसल्याने तो न काढण्यामागचे गौडबंगाल काय? याची चर्चा जिल्हा पोलीस दलात रंगली आहे.

‘या’ ठाण्यात अधिकार्‍यांची प्रतिक्षा

अकोले, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्या पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी मिळणार आहे. राहाता पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्त झाले असून तेथे सध्या सहा. निरीक्षक प्रभारी अधिकारी आहेत. तसेच संगमनेर तालुका व कर्जत पोलीस ठाण्याचा कारभार परि. पोलीस उपअधीक्षक पाहत आहेत. सायबर पोलीस ठाण्यालाही अद्याप स्वतंत्र पोलीस निरीक्षक मिळालेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या