Thursday, November 14, 2024
Homeराजकीयनगर : दिवंगत अनिल राठोड यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

नगर : दिवंगत अनिल राठोड यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

प्रखर हिंदुत्ववादी.. जनसामान्यांचा नेता.. निष्ठावंत शिवसैनिक.. शहरवासीयांचा भैय्या.. अशा विविध उपाधी देऊन शिवसेनेचे दिवंगत नेते स्वर्गीय अनिल राठोड यांना रविवारी नगरमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत राठोड यांचे हिंदुत्वाचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याच्या तोडीचे होते, अशी भावनाही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

- Advertisement -

नगरच्या नक्षत्र लॉनमध्ये राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल सर्वपक्षीय शोकसभा झाली. यावेळी उपस्थित सर्वांनीच राठोड यांच्या कार्याचा गौरव केला. 5 ऑगस्ट रोजी राठोड यांचे निधन झाले आहे. त्यानंतर शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा झाली. राठोड यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, विधानसभेचे माजी उपसभापती विजयराव औटी, राष्ट्रीय संघाचे प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, दिप चव्हाण, अभिषेक कळमकर, सुरेखा कदम, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, बाबुशेठ टायरवाले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, अनिल शिंदे, गणेश कवडे, श्याम नळकांडे, योगीराज गाडे, अनिल बोरुडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ज्येष्ठ संपादक बाळ बोठे आदींसह विविध पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

या श्रद्धांजली सभेमध्ये अनिल राठोड याना राज्यातील मान्यवरांनी फोनद्वारे तसेच व्हिडिओद्वारे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्‍हे, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार प्रताप जाधव, खासदार गिरीश बापट, छगन भुजबळ यांच्यासह अनेक यांचा यामध्ये समावेश आहे.

दिवगंत राठोड यांच्या जीवनावर तयार केलेला हिंदू धर्मरक्षक.. श्रध्येय अनिल भैय्या राठोड.. हा माहितीपट श्रद्धांजली सभेच्या ठिकाणी दाखविण्यात आला.

यावेळी मंत्री शंकराव गडाख म्हणाले की, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी न जगता सर्वसामान्य जनतेसाठी जगणारा, कट्टर शिवसैनिक अनिल राठोड यांच्या निधनाने पक्षाची व जिल्ह्याची मोठी हानी झाली. मात्र त्यांनी केलेलं कार्य हे आपल्याला पुढे न्यायचे आहे. त्यांचे कार्य पुढे नेले तरच त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. राठोड यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती न भरून येणारी आहे. कुटुंबासाठी ते कधीच जगले नाहीत. सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचे काम त्यांनी सातत्याने केलं. जनसामान्यांमध्ये त्यांची वेगळी प्रतिमा होती. फाटके-तुटक्यांचे नेतृत्वही त्यांनी केलं. राजकारणी वेगवेगळे विषय घेऊन राजकारण करतात. मात्र, भैय्यांनी तसे न करता सामाजिक भावनेतून राजकारण केले. सर्वसामान्यांसाठी वेळप्रसंगी त्यांनी अधिकार्‍यांना अंगावर घेण्याचे काम केले. ही धमक त्यांच्यामध्येच होती, असे ते म्हणाले.

शिवसेना सचिव देसाई म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सेना निष्ठेचे व सामान्यांसाठी संघर्ष करण्याचे बाळकडू मिळालेले माजी आमदार व उपनेते अनिल राठोड कट्टर सैनिक होते. माझा जवळचा मित्र अशी राठोड यांची ओळख होती. शिवसेनेच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. जनतेशी त्यांची नाळ जुळलेली होती. शिवसेना व भैय्या म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जायचे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्रध्दांजलीस वाहिली. ते म्हणाले की, गेली पंचवीस वर्षे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. ते माझे ज्येष्ठ मित्र होते. माझ्या कार्याचा सातत्याने त्यांनी गौरव केला, हे त्यांचं मोठेपण आहे. सामान्य माणसापर्यंत त्यांचं काम होतं. माणसं जोडली होती. जन्मभर समाजाची सेवा त्यांनी केली. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्यांची ओळख होती. कोणावर अन्याय केला नाही, म्हणूनच ते पंचवीस वर्षे आमदार राहिले. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली.

खासदार गिरीश बापट यांनी फोनद्वारे श्रध्दांजली वाहिली. ते म्हणाले की, समाजाचे नेतृत्व करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. छोट्या छोट्या लोकांसाठी त्यांच्या अडीअडचणीला सातत्याने धावून जाणे, असा त्यांचा स्वभाव होता.

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही फोनद्वारे श्रद्धांजली वाहताना राठोड यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, भैय्यांनी सामान्य माणसाची नाळ कधी तुटू दिली नाही. एकत्रितपणे विधानसभेमध्ये आम्ही काम केलं. युतीच्या काळामध्ये अनेक बैठकांचे ते साक्षीदार आहेत. अतिशय लढवय्या नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने श्रद्धांजली.

बुलढण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, विधानसभेमध्ये होतो त्या वेळेला आम्ही एकत्रितपणे काम केले. आजही त्यांची आठवण मला सातत्याने होते. अतिशय धडाडीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांनी मला कायम भावासारखे प्रेम दिले. एक कट्टर शिवसैनिक, प्रत्येकाच्या सुख दुःखात सामावून जायचं हा त्यांचा स्वभाव होता.

मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. भैय्यांचे जाणे ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांनी व मी एकत्रितपणे काम केले आहे. नगर शहरामध्ये त्यांनी चांगले काम केले. पाच वेळा ते आमदार झाले. ते राज्यमंत्रीही होते. नगर जिल्ह्यात राठोड यांचा आदरपूर्वक दबदबा होता. त्यांच्या निधनाने शिवसेना पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना उपनेत्या नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, नगर शहरात राठोड पाच वेळेला निवडून आले. त्यांना जनतेने मोलाची साथ दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ते सर्वांना सुपरिचित होते. 24 तास जनतेची सेवा केली. आज त्यांच्या निधनाने जिल्हा पोरका झाला आहे.

संपर्कप्रमुख कोरगावकर म्हणाले की, त्यांचे व माझे 1995 सालापासूनचे संबंध आहेत. अनेक जुन्या आठवणी त्यांच्या सांगता येतील. सातत्याने मदत करणारा नेता म्हणून राठोड यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांनी मलासुद्धा अनेकवेळा मदत केली आहे. आम्ही राठोड यांच्या कुटुंबाबरोबर आहोतच. अनिल भैय्या यांच्या कार्याचा ठसा व त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांच्या नावाने चरित्रग्रंथ व्हावा, अशी आपली कल्पना आहे. शिवसैनिकांनी त्यांच्याकडे असलेले जुने फोटो, आठवणी व साहित्य शिवसेनेकडे द्यावे. त्यातून त्यांचा ग्रंथ आपल्याला करता येईल. ही त्यांची आठवण कायम आपल्या स्मरणात राहील. जनता जनार्दनाची सेवा करणारा नेता आपण गमावला आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, अनिल पंचवीस वर्षे नगर शहरामध्ये जनतेसाठी सातत्याने उभे राहिले. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. माणसाने किती पैसे कमावले, यापेक्षा किती माणसं कमावली, असे म्हटले तर राठोड यांच्या कार्यावरून ते लक्षात येईल. अनेक संघर्षातून त्यांनी जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला.

माजी नगराध्यक्ष अभय आगरकर म्हणाले की, शहराच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. जनतेचा विश्वास त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होता. शहरातील प्रश्नासंदर्भात आम्ही एकत्र बसणार होतो. मात्र ही बैठक होऊ शकली नाही, याची मला खंत वाटते. राजकीय प्रवासात अनेक घडामोडी घडल्या. मात्र, त्यांनी मनामध्ये कधी कटुता ठेवली नाही.

यावेळी माजी महापौर सुरेखा कदम, भाजप शहराध्यक्ष भैया गंधे, संजय मिसाळ, रमेश जंगले, अशोक दहिफळे, संदेश कार्ले, डॉ. बापुसाहेब कांडेकर, माजी प्राचार्य सर्जेराव निमसे, प्रशांत अनभुले, वसंत लोढा आदींनीही श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करुन राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या