अहमदनगर (प्रतिनिधी)
शहरातील गल्ली-बोळातील रस्त्यांवर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाल्यावर आता नगर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा विषय महापालिकेने हाती घेतला आहे. शासनाच्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून सुमारे 30 किमी लांबीच्या 29 रस्त्यांच्या कामांसाठी अंदाजे 280 कोटींच्या निधीची मागणी केली जाणार आहे. या संदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बैठक घेऊन प्रस्ताव महासभेकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आयुक्त जावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मनपाच्या बांधकाम विभागाने या 29 रस्त्यांच्या कामांची यादी सादर केली. यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, नगररचना विभागाचे सहायक संचालक राम चारठाणकर, उपायुक्त श्रीनिवास कुरे, अभियंता श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते. बैठकीत प्रस्तावित रस्त्यांसाठी भूसंपादनाची गरज आहे का, या रस्त्यावर अतिक्रमणे आहेत का, रस्ते पूर्ण ताब्यात आहेत का, यातील कोणती कामे तातडीने करणे आवश्यक आहेत, या कामांपैकी कोणती कामे इतर निधीतून प्रस्तावित झाली आहेत का, सध्याची स्थिती काय, रूंदीकरणाची गरज आहे का, अशा मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केल्यानंतर आयुक्तांच्या मंजुरीने तो महासभेकडे सादर केला जाणार आहे. या कामांसाठी सुमारे 280 कोटींचा निधी अपेक्षित असून, त्याला महासभेची मंजुरी घेऊन शासनाकडे निधीच्या मागणीसाठी पाठवला जाणार आहे. जसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार प्राधान्यक्रमाने कामे प्रस्तावित केली जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.