Thursday, September 19, 2024
Homeनगरआषाढ आणि श्रावणसरींनी मिटवली; नगर-नाशिककरांची समन्यायीची चिंता!

आषाढ आणि श्रावणसरींनी मिटवली; नगर-नाशिककरांची समन्यायीची चिंता!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

भंडाररदरा, मुळा, दारणा आणि गंगापूर धरणांच्या पाणलोटात सुरूवातीला आषाढसरींनी आणि त्यानंतर आता श्रावणसरींनी तांडव केल्याने जायकवाडी धरणात पाण्याची प्रचंड आवक होत आहे. परिणामी आज बुधवारी रात्रीपर्यंत जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांच्या पुढे सरकणार असल्याने नगर-नाशिक जिल्ह्यावर समन्यायी पाणीवाटपाचे संकट टळणार आहे.

पावसाळ्याच्या सुरूवातीला जायकवाडी धरणातील पाणीसाठा केवळ 4 टक्के होता. पण नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात आषाढ सरी भरभरून बरसल्याने या दोन्ही जिल्ह्यांतील धरणं ओव्हरफ्लो झाली आाणि जायकवाडीकडे पाणी झेपावले. त्यामुळे जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 30 टक्क्यांवर आला. त्यानंतर गत आठ दिवसांपासून पाणलोटात श्रावणसरींंचे तांडव सुरू असल्याने गोदावरी आणि प्रवरा नदीला पूर आला. मुळाही अजून दुथडी वाहत आहे. त्यामुळे तिन्ही नद्यांतून जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 97 हजार 777 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. गोदावरीतून 53500 क्युसेकने तर मुळा-प्रवरा नदीतून 32 हजार 784 क्युसेकने आवक होत होती. काल रात्री आठ वाजता या धरणात 59.37 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. या धरणातील विसर्ग पाहता आज रात्री पर्यंत धरणात 65 टक्के उपयुक्त पाणीसाठा हाऊ शकतो. त्यामुळे नगर, नाशिक च्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याची समन्यायी पाणी वाटपाची चिंता मिटणार आहे. यावर्षी पाणी सोडण्याचे संकट टळणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी सुखावणार आहेत.

काल रात्री 8 वाजता जायकवाडी जलाशायात उपयुक्तसाठा 59.37 टक्के इतका झाला होता. म्हणजेच 45.53 टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात होते. तर मृतसह एकूण पाणीसाठा 71.60 टीएमसी इतके झाले आहे. जायकवाडीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जिवंत पाणीसाठा 65 टक्के होणे अपेक्षित असते. म्हणजेच 50 टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात होणे अपेक्षीत असते. उपयुक्त साठ्यात 4.5 टीएमसी पाण्याची गरज आहे. ते आज पूर्ण होईल. काल रात्री 8 वाजता 59.37 टक्के असलेला उपयुक्तसाठा आज पासष्टी ओलांडणार आहे. अजुनही दमदार पाऊस शिल्लक असल्याने अजुनही जायकवाडीत मोठ्या प्रमाणात पाण्याचे वहन होऊ शकते. जायकवाडीही पावसाचा जोर टिकून राहिल्यास ओव्हरफ्लो होऊ शकते. तसेच झाल्यास मराठावाड्याचा पाणीप्रश्नही सुटणार आहे.

नाशिक च्या धरणातील काल रात्री 8 वाजताचे विसर्ग असे- गंगापूर 520 क्युसेक, दारणा 5848 क्युसेक, भावली 481 क्युसेक, भाम 2990 क्युसेक, वालदेवी 183 क्युसेक, वाकी 855 क्युसेक, कडवा 3292 क्युसेक, आळंदी 243 क्युसेक, भोजापूर 990 क्युसेक, पालखेड 3908 क्युसेक, करंजवण 295 क्युसेक वाघाड 2275 क्युसेक, तिसगाव 322 क्युसेक, पुणेगाव 1300 क्युसेक, ओझरखेड 1320 क्युसेक असे विसर्ग सुरु आहेत. या सर्व विसर्गाचे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होवुन गोदावरीतुन जायकवाडी च्या दिशेने झेपावत आहेत.

जायकवाडी धरणात 97000 क्युसेक्सने पाण्याची आवक होत असून जायकवाडीचा जिवंत पाणीसाठा आज 50 टीएमसी म्हणजेच 65 टक्के होत आहे. मध्यंतरी मान्सुनचा जोर कमी झाल्याने समन्यायीचे संकट यावर्षीही येणार अशी भीती नगर – नाशिक जिल्ह्यात निर्माण झाली होती. नगर – नाशिक भागातील धरणे भरली तरी नजरा मात्र जायकवाडीकडे लागल्या होत्या. परंतु सह्याद्री घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे एका आठवड्यात चित्र बदलले आणि जायकवाडीचा जिवंत पाणीसाठा अपेक्षेपेक्षा आधीच 65 टक्के होत आहे. जायकवाडी धरणात नगर – नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 29 टीएमसी ओव्हरफ्लोचे पाणी तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रासह एकुण 47.5 टीएमसी पाणी आजपर्यंत जायकवाडी मध्ये गेले आहे. समन्यायीचा प्रश्र्न या वर्षासाठी संपला असला तरी घाटमाथा वगळता नगर – नाशिक जिल्ह्यातील पर्जन्यछायेतील भागात खालावलेली भुजलपातळी वाढण्यासाठी अजुनही सर्वदुर दमदार पर्ज्यन्यवृष्टीची गरज आहे.
– उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या