अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे आता संपले आहेत. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागातील मतदारसंघातील मतदान पूर्ण झालंय. अनेक दिग्गजांचं भवितव्य आता निश्चित झालं असून 4 जून रोजी त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लढत ही यंदा चांगलीच लक्षवेधी ठरली. मतदानानंतर या दोन्ही मतदारसंघात आता नवा खासदार कोण होणार? याची चर्चा मतदारांमध्ये रंगत आहे. ही चर्चा फक्त शाब्दिक पातळीवर राहिली नसून त्यासाठी काहींनी पैजाही लावल्या आहेत.
दक्षिण नगर मध्ये भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाच्या नीलेश लंके यांच्यात लढत झाली. तर शिर्डीत शिवसेनेच्या दोन गटांतच लढत रंगली. शिंदे गटाकडून खा. सदाशिव लोखंडे, ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित आघाडीकडून उत्कर्षा रूपवतेंसह अन्य अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी चांगलीच गाजली. कोणत्या गावात किती मतदान झाले, कोणी प्रामणिक काम केले आणि कुणी गद्दारी केली याचा आढावा उमेदवार आणि नेत्यांकडून घेतला जात आहे.
मराठा समाजाचा कौल कोणत्या उमेदवाराला होता. ओबीसी समाजाने कोणती भूमिका घेतली. मुस्लिम समाजाचे गठ्ठा मतदान कुणाला पडले असावे याचा कयास ज्याच्या त्याच्या पध्दतीने लावला जात आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी पैंजा लावल्या आहेत. शहरांमध्ये काही नगरसेवक, तसेच मोठ्या गावांत ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांनी दोन्ही उमेदवारांना खूश करण्याचे काम केल्याची वंदता होती. तसेच आपला मतदार नाराज होणार नाही याची काळजीही घेण्यात येत होती. 4 जूनला जाहीर होणार्या निकालामध्ये कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली याची आकडेवारी जाहीर होणार असल्याने आता कोणी काही ही सांगत असले तरी कोणत्या भागातून उमेदवारांना किती मते मिळाली हे जाहीर होणार आहे.