अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून यात नगर जिल्ह्यातील महायुतीच्या दोनही विद्यमान खासदारांचा पराभव झाला. महाआघाडीच्या उमेदवारांनी दोन्ही जागा जिंकत इतिहास रचला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे विद्यमान खा. सदाशिव लोखंडे यांचा 50 हजार 529 मतांनी तर नगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नीलेश लंके यांनी भाजपचे खा.डॉ. सुजय विखे पाटील यांचा 28 हजार 929 हजारांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत लंके यांनी भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणार्या गडाला खिंडार पाडले. त्यांच्या विजयात पारनेर तालुक्यातील मताधिक्क्याचा मोलाचा वाटा असून वाकचौरे यांच्या विजयात अकोले, संगमनेर विधानसभा क्षेत्रातील मताधिक्याने निर्णायक भुमिका बजावली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यात महायुतीला धक्का दिला. शिर्डी आणि नगर या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. पक्षफुटीमळे मशाल या चिन्हासह निवडणुकीला सामोरे गेलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वाकैचारे यांची मशाल चांगलीच पेटली तर नगर दक्षिणमध्ये लंके यांची तुतारी जोरात वाजली. निकालानंतर विजयी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करत गुलालाची उधळण करत जय भवानी जय शिवाजीफच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकलेला होता. शिर्डीचा निकाल आधी जाहीर झाला. हायहोल्टेज ठरलेल्या नगर लोकसभा मतदारसंघाचा निकाला हाती येण्यास उशीर झाला. मतमोजणी प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत संथगतीने सुरू होती. दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान विजयाची खात्री होताच निलेश लंके मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. त्याठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांसह मोजणीच्या प्रक्रियेत सहभागी कार्यकर्ते, पोलींग एजंट यांच्याशी संवाद साधला.
यावेळी काही काळ लंके भावनिक झाल्याचे दिसून होते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत मतेमोजणी कक्षात ठाण मांडून होते.
नगर एमआयडीसीत असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अधिपत्याखाली मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता. जिल्ह्यामध्ये नगर व शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ येतात या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये 63.3 टक्के मतदान झालेले होते. नगरमध्ये 66.78 टक्के तर शिर्डीमध्ये 63.3 टक्के झालेल्या मतदानाचा समावेश होता. काल सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार असल्याने मतमोजणीच्या ठिकाणी सकाळपासून मोठी गर्दी होती.
मतमोजणी सुरू झाल्यावर साधारण दहाच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल हाती आला. यात लंके सुमारे अडीच ते तीन हजाराच्या फरकाने पिछाडीवर होते. ही परिस्थिती सहाव्या फेरीपर्यंत कायम होती. मात्र, सातव्या फेरीत लंके यांनी जवळपास 13 हजारांची आघाडी घेतली. यामुळे विखे यांची आघाडी संपून त्यांच्यावर लंके यांनी आघाडी घेतली. कमी अधिक फरकाने लंके यांची ही आघाडी 19 व्या फेरीपर्यंत कायम होती. मात्र, 20 व्या फेरीत विखे यांनी साडे तीन ते चार आणि 21 व्या फेरीत 3 हजारांची आघाडी घेतली. यामुळे काही प्रमाणात विखे यांच्यासाठी आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, त्यानंतरच्या सर्व फेर्यामध्ये लंके यांनी आघाडी घेत 28 हजार 576 हजार मतांनी विखे यांचा पराभव केला. मंगळवारी सकाळी सुरुवातीला नगर मतदारसंघांमध्ये पोस्टल मतेही मोजण्यात आली. त्यानंतर अतिशय संथगतीने मतमोजणी झाली. पहिल्या टप्प्यामध्ये नगर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे डॉ.सुजय विखे यांनी 9 हजार 356 मते मिळवून आघाडी घेतलेली होती व ही आघाडी सहाव्या फेरीपर्यंत कायम होती. मात्र, त्यानंतर या मतमोजणीचे चित्र बदल्याचे दिसून आले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उध्दव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा 50 हजार 529 मतांनी विजय साजरा केला. त्रांनी 4 लाख 76 हजार 900 मते घेतली. त्यांनी खासदार सदाशिव लोखंडे रांची हॅटट्रिकची संधी हिरावून घेतली. लोखंडे यांना 4 लाख 26 हजार 371 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते 90 हजार 929 मते घेत तिसर्या क्रमांकावर राहिल्या आहेत. दरम्यान वाकचौरे यांना दोन विधानसभा मतदार संघाने मोठे मताधिक्य दिले. अकोल्यातून 54 हजार 379 तर संगमनेर मधून 30 हजार 573 मतांचा लीड मिळाला आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर रांनी निवडणूक निर्णर अधिकारी म्हणून काम पाहिले. सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून वाकचौरे यांनी लीड घेतला. पहिल्या फेरीत त्यांना 2 हजार 58 मतांचा लीड होता. तो मधल्या काही फेर्या ओघळता शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिला. अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर यांनी सायंकाळी सहा वाजता वाकचौरे यांना विजयी घोषीत केले. त्यांनी विजयाचे प्रमाणपत्र वाकचौरे यांना सुपूर्त केले.
दरम्यान वाकचौरे यांना अकोले विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 93 हजार 25 मते पडली. तेथे लोखंडे यांना 38 हजार 646 मतेच मिळाली तर रूपवते यांनी 8 हजार 840 मते घेतली. अकोलेमधून 54 हजार 379 मतांचे लीड वाकचौरे यांना मिळाले. तसेच संगमनेर विधानसभा मतदार संघातून वाकचौरे यांना 97 हजार 561, लोखंडे यांना 66 हजार 988 तर रूपवते यांना 10 हजार 923 मते मिळाली. या मतदार संघातून वाकचौरे यांना 30 हजार 573 मतांचा लीड मिळाला. शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा मतदार संघातून लोखंडे यांना लीड मिळाला परंतू अकोले व संगमनेरमधून वाकचौरे यांना मिळालेला लीड कमी करण्यासाठी तो अपूरा पडला आणि वाकचौरे 50 हजार 529 मतांची विजयी झाले. लोखंडे आणि वाकचौरे रांच्रात सरळ लढत होईल, असे वाटत असतानाच वंचितकडून उत्कर्षा रूपवते लोकसभा निवडणुकीच्रा मैदानात आल्रा. 90 हजार 929 मते घेत त्या तिसर्या क्रमांकावर राहिल्या. भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी केली त्यांना 14 हजार 6 मते मिळाली. तर नोटाला 5 हजार 380 मते मिळाली आहेत.
शिर्डीतील उमेदवारनिहाय मते
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (4 लाख 76 हजार 900), रामचंद्र नामदेव जाधव (7 हजार 40), सदाशिव किसन लोखंडे (4 लाख 26 हजार 371), उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (90 हजार 929), अॅड. नितीन दादाहारी पोळ (2 हजार 532), भारत संभाजी भोसले (3 हजार 403), राजेंद्र रत्नाकर वाघमारे (2 हजार 505), अभिजित अशोक पोटे (4 हजार 776), अशोक रामचंद्र उल्हाट (1 हजार 798), नचिकेत रघुनाथ खरात (1 हजार 150), विजयराव गोविंदराव खाजेकर (1 हजार 557), गंगाधर राजाराम कदम (2 हजार 757), चंद्रकांत संभाजी दोंदे (2 हजार 80), प्रशांत वसंत निकम (2 हजार 545), गोरक्ष तानाजी बागूल (2 हजार 660), भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (14 हजार 6), रवींद्र कलय्या स्वामी (5 हजार 537), सतिष भिवा पवार (2 हजार 771), अॅड. सिध्दार्थ दीपक बोधक (2 हजार 207), संजय पोपट भालेराव (960), नोटा (5 हजार 380).
नगरमधील उमेदवारनिहाय मते
उमाशंकर यादव (बसपा) 4 हजार 539, नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट) 6 लाख 24 हजार 797 (28929 मतांनी विजयी), डॉ. सुजय विखे पाटील (भाजप) 5 लाख 95 हजार 868, आरती हालदार (प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष) 3 हजार 799, कालीराम पोपळघट (भारतीय नवजवान सेना) 1 हजार 981, डॉ. कैलास जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी) 1 हजार 435, रवींद्र कोठारी (राष्ट्रीय जनसंघ) 1 हजार 330, दत्तात्रय वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पक्ष) 868, दिलीप खेडकर (वंचित बहुजन आघाडी) 13 हजार 689, भगवान गायकवाड (समता पक्ष) 4 हजार 941, मदन सोनवणे (राईट दू रिकॉल पक्ष) 1 हजार 445, रावसाहेब काळे (बहुजन मुक्ती पक्ष) 370, भाऊसाहेब वाबळे (भारतीय जवान किसान पक्ष) 790, शिवाजीराव डमाळे (सैनिक समाज पक्ष) 1 हजार 93, अमोल पाचुंदकर (अपक्ष) 5 हजार 491, महेंद्र शिंदे (अपक्ष) 634, मच्छिंद्र गावडे (अपक्ष) 1 हजार 940, गंगाधर कोळेकर (अपक्ष) 1 हजार 69, नवशाद शेख (अपक्ष) 2 हजार 226, प्रविण दळवी (अपक्ष) 1 हजार 896, सुर्यभान लांबे (अपक्ष) 2 हजार 92, अनिल शेकटकर (अपक्ष) 702, अॅड. महंमद जमीर शेख (अपक्ष) 3 हजार 934, बिलाल गफूर शेख (अपक्ष) 531, गोरख आळेकर (अपक्ष) 44 हजार 582 आणि नोटा 3 हजार 282 असे आहे.