अहमदनगर | प्रतिनिधी
नगर-आष्टी प्रवासी डेमू रेल्वेला सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास नगर शहराजवळील शिराढोण ते वाळुंज फाट्या दरम्यान आग लागली. या आगीत रेल्वेचे पाच डबे जळून भस्मसात झाले. या रेल्वेत तुरळक 8 ते 10 प्रवासी होते. प्रवाश्यांनी जीवाच्या भीतीने, वेग कमी झाल्यानंतर धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणास दुखापतही झाली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बहुचर्चित व बहुप्रतिक्षित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यातील नगर ते आष्टी या पहिल्या टप्प्यातील रेल्वेरूळाचे काम पूर्ण होऊन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही रेल्वे सुरू करण्यात आली. सुरूवातीला सकाळी व संध्याकाळी अशा दोन फेर्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र प्रवाशांचा प्रतिसादच नसल्याने काही दिवसातच एक फेरी कमी करण्यात आली.
सोमवारी दुपारी नगरहून आष्टीकडे जाणार्या रेल्वे गाडीच्या पहिल्याच डब्याला आग लागली व ती पसरत गेली. राष्ट्रीय महामार्गचे काम करणारे रस्त्यावरील मजूर व वाळुंज ग्रामस्थांच्या आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करत माहिती दिली तसेच रेल्वे प्रशासन व नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले. मनपा तसेच संरक्षण विभागाच्या सीक्यूएव्ही, व्हीआरडीई व नगर एमआयडीसीचे सहा बंब आग विझवण्यासाठी धावले. तोपर्यंत पाच डबे आगीच्या भक्षस्थानी पडले होते.
सायंकाळी 4:15 च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशामन दलाच्या यंत्रणांना यश आले त्यानंतर रेल्वेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी उर्वरित डबे बाजूला काढले या घटनेत कोणासही दुखापत झालेली नाही मात्र आग कशामुळे लागली हे रेल्वे प्रशासनाने सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट केले नव्हते.
गार्डच्या बाजूची ब्रेक व्हॅन व त्याला लागून असलेले डबे जळून खाक झाले. दौंड होऊन घटनास्थळी रेल्वे अपघात मदत विभागाची (एआरटी) यंत्रणा पाठवण्यात आली होती. रेल्वे इंजिनला लागूनच ऑईलची टाकी होती, या टाकीजवळ आग पोहोचण्यापूर्वीच ती वीजवण्यात आली. परिणामी टाकीचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.