मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 32 विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आले असले तरी नाशिक जिल्ह्यातील निफाडचे आमदार दिलीप बनकर, पुण्यातील हडपसर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे, अणुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक,बीड जिल्ह्यातील आष्टीचे बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा समावेश नाही. तर भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या जागी 24 तासांपूर्वी भाजपमधून पक्षात दाखल झालेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच नगर जिल्ह्यात आ. आशुतोष काळे यांना कोपगावात तर आ. संग्राम जगताप यांना नगर शहरात, आ. किरण लहामटेंना अकोलेसाठी पुन्हा उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. या तिघांचाही अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्सुकतेचे वातावरण तयार झाले आहे.
ठाकरे सेनेत नगर जिल्ह्यात गडाख
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ कायम असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत विधानसभेतील विद्यमान 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर एकमत होत नसल्याने विधानसभेतील गटनेते अजय चौधरी यांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात नेवाश्यामधून माजी मंत्री शंकरराव गडाख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असतांना ठाकरे गटाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे.