Thursday, November 21, 2024
Homeनगरसायंकाळी उशीरापर्यंत नगरच्या काही भागात मतदान

सायंकाळी उशीरापर्यंत नगरच्या काही भागात मतदान

63.87 टक्के मतदान || तरुणांसह ज्येष्ठ, दिव्यांगांनी बजावला हक्क

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभेच्या मतदानोत्सवात अहिल्यानगरकरांनी सकाळपासूनच उत्साह दाखवित मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सातपासूनच नागरिक कुटुंबासह घराबाहेर पडत होते. केंद्रावर हळूहळू गर्दी वाढू लागल्याने रांगाही लागल्या. काहींनी कुटुंबांसह मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदान केले. दरम्यान, नगर शहरात सकाळी नऊपर्यंत 5.8 टक्के मतदान झाले होते. त्यात सातत्याने वाढ होत गेली. सायंकाळी सहापर्यंत 63.87 टक्के मतदान झाले होते. सारडा महाविद्यालय, राधाबाई काळे कॉलेज, भिंगार कॅन्टोंन्मेट, कोठी आदी ठिकाणी सायंकाळी सहानंतरही रांगा होत्या.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सातपासून मतदानाला सुरूवात झाली. मागील सुमारे एक ते दीड महिन्यांपासून निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू होती.उमेदवारांच्या समर्थकांच्या फेर्‍या गल्लीबोळातून सुरू होत्या.राजकीय नेत्यांच्या दोन ते तीन सभा वगळता जास्त सभा झाल्या नाही. घरोघरी जाऊन प्रचार करण्यात उमेदवारांनी भर दिला. दरम्यानच्या काळात मनपाच्या बीएलओ मंडळींनीही मतदार यादीनुसार मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मतदार स्लिपा पोहोचवल्या. त्यानुसार कोणाचे मतदान कोठे आहे, याची माहिती मिळाली. बुधवारी सकाळी सातपासून मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांनी ओळख पटवण्यासाठी कोणी आधारकार्ड वा पॅनकार्ड समवेत घेतले. काहींनी फोटो असलेली अन्य ओळखपत्रे जवळ ठेवली.

मतदान केंद्रावर रांग असेल तर त्यात उभे राहणे योग्य मानले. महिलांसाठीच्या वेगळ्या रांगेत महिला उभ्या राहिल्या. शहरातील मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी झाली होती. कुटुंबासह येऊन मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडले जात होते. केंद्राच्या आवारातील झाडांभोवतीच्या कट्ट्यावर काहीजण विसावले होते. अनेक महिला छोट्या मुलांसह मतदान करण्यासाठी आल्या होत्या. त्यांना तसेच ज्येष्ठ महिला व नागरिकांना रांगेत उभे असणारे आवर्जून पुढे जाऊ देत होते. शाळेची काही मुलेही मतदारांच्या स्लिप पाहून त्यांचे मतदान नेमके कोठे आहे, याची माहिती देत होते. ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांना खुर्चीत बसवून मतदान केंद्रात नेले जात होते. प्रत्येक केंद्रावर पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा बंदोबस्त होता. त्यांना मदतीसाठी होमगार्ड तैनात होते.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची मतदान केंद्रावर दिवसभर गस्त सुरू होती. मतदान केंद्रावर सावलीसाठी मंडपही होते. पिण्याच्या पाण्याची सोय होती. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी होती. सकाळी सात ते नऊपर्यंत 5.8 टक्के मतदान झाले. त्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 16.92 टक्क्यांनी वाढ झाली. दुपारी एक पर्यंत 30.83 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी तीनपर्यंत 44.17 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पाचपर्यंत 56.43 टक्के तर सहापर्यंत 63.87 टक्के मतदान झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ असल्याने सायंकाळी मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती. बोल्हेगाव येथील एका मतदान केंद्रावर एका उमेदवाराच्या नातेवाईकांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला. मात्र यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

मतदानातून दिसला दिव्यांगांचा उत्साह
मतदानाचा टक्का वाढून, लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिव्यांगांनी घराबाहेर पडून मतदान केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. यामध्ये दिव्यांगांचा उत्साह दिसून आला. शहरासह उपनगरातील मतदान केंद्रावर दिव्यांग, अस्थिव्यंग व मतिमंद दिव्यांग व्यक्तींनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. या दिव्यांग मतदारांचा जिल्हा समाज कल्याण विभागाकडून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

शस्त्रधारी सुरक्षा रक्षक
अहमदनगर शहरातील मतदार संघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. प्रत्येक मतदान केंद्राच्या गेटवर केंद्रीय सुरक्षा पथकातील शस्त्रधारी पोलीस तैनात केले होते. त्यांच्याकडून मतदानासाठी आलेल्या प्रत्येकाला विचारणा करूनच आत सोडले जात होते. मतदारांकडील मोबाईल, वाहन नेण्यास मनाई केली जात होती.

समर्थकांनी जोडले हात
नगर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार संग्राम जगताप व महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मतदान केंद्रांबाहेर जगताप व कळमकर यांचे समर्थक मतदारांना हात तोडताना दिसत होते. मतदार राजा दोन्हीकडे हात जोडून आहे लक्षात आमच्या…असे सांगून पुढे जात होता. मतदान केंद्रांबाहेर राजकीय पक्षांचे समर्थक मंडपामध्ये मतदारांना त्यांच्या नावाची स्लिप करून देताना दिसत होते. मतदार यादीतील त्यांचे नाव शोधून त्यानुसार मतदान केंद्रातील कोणत्या खोलीत त्यांचे मतदान आहे, हे सांगितले जात होते.

बीएलओ मंडळींकडून मदत
मनपाच्या बीएलओ मंडळींनी मतदार यादीनुसार मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मतदार क्रमांकाच्या स्लिपा पोहोचवल्या होत्या त्यानुसार कोणाचे मतदान कोठे आहे, याची माहिती बहुतांशजणांना मिळाली होती. काही राजकीय पक्षांनीही स्वतंत्र स्लिपा मतदारांना दिल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर मतदान सहाय्यता कक्ष उभारण्यात आला होता. त्या ठिकाणी असलेल्या मनपाच्या बीएलओ मंडळींकडून मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या शंकांचे निरसन केले जात होते. ज्या मतदारांकडे स्लिपा उपलब्ध नसतील त्यांचा मतदार क्रमांक शोधून देणे, त्यांचे मतदान कोणत्या बूथवर आहे ते दाखविणे आदी कामे केली जात होती. मात्र काही ठिकाणी असलेल्या बीएलओ मंडळींना जेवण मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या