Saturday, May 4, 2024
Homeनगरदक्षिणेत अनेक ठिकाणी कडधान्य बियाण्यांचा तुटवडा

दक्षिणेत अनेक ठिकाणी कडधान्य बियाण्यांचा तुटवडा

अहमदनगर /कर्जत (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या दक्षिण भागात मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीमुळे कडधान्य पिकांची मागणी अचानक वाढली आहे. यातही उडीदाच्या बियाणासाठी मोठी मागणी असल्याने अचानक टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये चक्क पोलीस बंदोबस्तात उडीद पिकाच्या बियाणांचेे वितरण करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती जामखेड, नगर, पारनेर आणि दक्षिणेतील अन्य तालुक्यांत निर्माण झाली आहे.

जिल्ह्याच्या दक्षिण भागात मान्सूनपूर्व दमदार पाऊस झाल्याचा कडधान्य पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. यात कर्जत आणि जामखेडमध्ये उडिद पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पारनेरमध्ये वाटाणा आणि अन्य कडधान्यांचे क्षेत्र अधिक आहे. नगर तालुक्यात मूग, उडिद अन्य पिकांचे क्षेत्र आहे. यंदा जोरदार मान्सूनपर्व पावसामुळे दक्षिणेत शेतकर्‍यांची पेरणीसाठी एकच झुंबड उडाली आहे. त्याच करोना लॉकडाऊन उठल्यामुळे शेतकरी अनेक ठिकाणी बियाणे खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहे. जिल्ह्यात कडधान्यासह अन्य पिकांचे मुबलक बियाणे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

- Advertisement -

दरम्यान, कर्जत येथील प्रतिनिधीच्या माहितीनुसार तालुक्यामध्ये सर्वत्र ठराविक अशा कंपनीच्या उडीद बियाण्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी निर्माण झाली. त्यामुळे तालुका कृषी विभाग पंचायत समिती कृषी विभाग यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकर्‍यांना प्रत्येक दुकानांमध्ये बियाणे उपलब्ध करून दिले. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उडीद पिकाची लागवड करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी काही ठराविक कंपन्यांच्या बियाणांची मागणी करत आहेत आणि ते बियाणे मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. वास्तविक पाहता इतर कंपन्यांचे मूग उडीद बियाणे असताना केवळ ठराविक कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याच्या शेतकर्‍यांच्या मानसिकतेमुळे त्यांची टंचाई निर्माण झाली आहे व त्या कंपन्यांकडून पुरेसे बी उपलब्ध होत नसल्यामुळे विक्रेते देखील त्रस्त झाले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी काही ठराविक कंपन्यांची बियाणे उपलब्ध होतात तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर व पंचायत समितीचे कृषी विभागाचे अधिकारी रुपचंद जगताप व त्या दोन्ही विभागाचे कर्मचारी यांनी सर्व दुकानांमध्ये पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन शेतकर्‍यांना नोंदणी करून त्याचे योग्य नियोजन करून वाटप केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या