अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहमदनगर शहर मतदारसंघात 3 लाख 16 हजार 794 मतदार आहेत. या मतदारांसाठी 297 मतदान केंद्र राहणार आहेत. 1 हजार 656 अधिकारी-कर्मचार्यांची मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती केली आहे. शहरातील मार्गावर 37 बसेस आणि 69 जीप वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.
दरम्यान, सर्व मतदान केंद्रासाठी निवडणूक साहित्याचे वाटप काल, मंगळवारी सकाळी नागापूर एमआयडीसीतील महाराष्ट्र वखार महामंडळ गोडाऊन क्रमांक 6 येथून करण्यात आले. सकाळी आठ वाजेपासून अधिकारी- कर्मचारी यांनी आपापल्या केंद्राचे निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यांना मतदान साहित्यासह आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले आहे. मतदान साहित्य व कर्मचार्यांची वाहतूक करण्यासाठी मतदान प्रक्रियेवर परिणामकारक नियंत्रणासाठी 20 क्षेत्रिय अधिकारी नियुक्त केले आहेत. आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महिला, दिव्यांग, युवा आणि आदर्श मतदान केंद्र केले जाणार आहेत.
महिला संचलित मतदान केंद्र हे बोल्हेगावातील मारूतराव घुले पाटील आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयामध्ये मतदान केंद्र क्रमांक 38 राहणार आहे. दिव्यांग अधिकारी-कर्मचार्यांमार्फत भिंगारमधील सरदार वल्लभभाई पटेल कन्या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 297 हे संचलित केले जाणार आहे. युवा अधिकारी-कर्मचार्यांमार्फत केडगावातील शाहूनगरमधील मतदान केंद्र क्रमांक 286 संचलित केले जाणार आहे. तीन आदर्श मतदान केंद्र राहणार आहेत.
राधाबाई काळे महिला महाविद्यालय मतदान केंद्र क्रमांक 119, आयकॉन पब्लिक स्कूल, चाहूराणा मतदान केंद्र क्रमांक 261, बोल्हेगावातील मारूतराव घुले पाटील आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयामध्ये मतदान केंद्र क्रमांक 28 राहणार आहे. या मतदारसंघात 3 लाख 16 हजार 794 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 60 हजार 646 पुरूष, 1 लाख 56 हजार 41 महिला तर 107 तृतीय मतदार आहेत. शहर हद्दीत 85 वर्षांवरील 3 हजार 405 मतदार आहेत. 134 मतदारांनी गृह मतदान केले आहे.
पडदनशील मतदान केंद्र
शहरातील मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागातील मतदान केंद्रांवर बुरखा परिधान केलेल्या महिलांची ओळख पटविण्यासाठी जादा महिला कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. शहरात 47 पडदानशील मतदान केंद्र आहेत.