Saturday, July 27, 2024
Homeनगरनगरमध्ये आणखी दोन उड्डाणपूल

नगरमध्ये आणखी दोन उड्डाणपूल

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

अहमदनगर जिल्ह्यातील विकासाच्यादृष्टीने रस्ते विषयक विविध मागण्याना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्वत: मंजूरी दिली आहे. नगर-मनमाड रस्त्यादरम्यानच्या डीएसपी चौक आणि एमआयडीसी येथे दोन उड्डाणपुल तथा भुयारीमार्ग बांधणे, शेवगाव येथे बाह्यवळण रस्त्याचे काम करणे, तसेच नगर शहरातील डीएसपी चौक येथील शासकीय निवासस्थाने बांधा, वापरा, हस्तांतरण करा या तत्वावर विकसित करण्याबाबतच्या मागण्यांचा यात समावेश असल्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने मंगळवार (दि.26) मुंबई मंत्रालय येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण आणि महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, बांधकामे विभागाचे सचिव संजय दशपुते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नगर जिल्ह्यातील सद्यस्थिती लक्षात घेता येत्या काळात वाहतुकीचे सुनियोजन करण्याच्यादृष्टीने नगर-मनमाड रस्ता कामाच्या मंजुर निधीतुन डीएसपी चौक आणि एमआयडीसी असे दोन उड्डाणपुल तथा भुयारीमार्ग बांधणे, शेवगाव येथे बाह्यवळण रस्त्याचे काम करून तालुक्याच्या ठिकाणी होणार्‍या वाहतुकीचे नियोजन करणे, तसेच दुरवस्थेत आलेल्या नगर शहरातील डीएसपी चौक येथील शासकीय निवासस्थाने बांधा, वापरा, हस्तांतरण करा या तत्वावर विकसित करण्याबाबतचे एक सादरीकरण बैठकीत करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सदर विकास कामांना तत्वत: मंजूरी दिल्याची माहिती विखे पाटील यांनी सांगितली. या मागणीमुळे नगर जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीचे योग्य नियोजन होऊन जनतेला वाहतुकीसाठी अतिशय चांगले आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध होणार आहेत, विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या