Monday, May 27, 2024
Homeनगरबँकेच्या अधिकार्‍याचा खातेदारांच्या पैशावर डल्ला

बँकेच्या अधिकार्‍याचा खातेदारांच्या पैशावर डल्ला

अहमदनगर (प्रतिनिधी)

येथील माणिक चौकात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या मुख्य शाखेतील तात्कालिन अधिकार्‍याने बँक खातेदारांच्या खात्यातून वेळोवेळी नऊ लाख 30 हजाराची रक्कम परस्पर दुसर्‍यांच्या खात्यावर टाकून नंतर ती स्वत: च्या खात्यावर घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक दिलीप आनंदराव ढोबळे (वय 44 रा. भिस्तबाग चौक सावेडी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि. 12) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिलेल्या फिर्यादीवरून पौखोचीन गुईटे (मुळ रा. पटटा, मणिपुर, सध्या नेमणुक गुवाहाटी, आसाम) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 जून 2023 पूर्वी गुईटे हा माणिक चौकातील बँक ऑफ बडोदाच्या मुख्य शाखेत कार्यरत होता. त्याच्याकडे बँकेच्या दैनदिन परिचलनाची जबाबादारी असल्याने बँकेच्या संगणकाचा अ‍ॅक्सेस त्याच्याकडे होता. त्याने बँकेतील काही खातेधारकांच्या खात्यातील रक्कम संगणकीय प्रणालीमध्ये अनाधिकृत व्यवहार करून परस्पर खातेदारांच्या संमतीशिवाय स्वत: चे ओळखीच्या लोकांच्या खात्यावर टाकली.
दरम्यान, याबाबतची तक्रारी बँकेकडे प्राप्त झाल्यानंतर बँकेच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली असता गुईटे याने चार खातेदारांच्या खात्यातील एकुण नऊ लाख 30 हजार रूपयांची रक्कम अप्रामाणिकपणे संगणकीय प्रणालीमध्ये बनावट व्यवहार दाखवून खातेदारांच्या संमतीशिवाय दुसर्‍यांच्या खात्यावर टाकून त्यानंतर त्याने स्वत: च्या खात्यावर टाकली आहे.

खातेदारांची तसेच बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात व्यवस्थापक ढोबळे यांनी 21 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे गुईटे विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची कोतवाली पोलिसांनी चौकशी करून व्यवस्थापक ढोबळे यांना गुरूवारी पोलीस ठाण्यात बोलवून घेत फिर्याद दाखल करण्यास सांगितले. ढोबळे यांच्या फिर्यादीवरून पौखोचीन गुईटे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या