अहमदनगर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर शनिवारी (दि. 15) रात्री सावेडी उपनगरातील एकविरा चौकात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने खूनी हल्ला झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
शनिवारी रात्री चत्तर यांच्या शेजारी राहणार्या एका मुलाचे एकविरा चौकात काही मुलांसोबत भांडण झाले होते. चत्तर यांनी घटनास्थळी जात भांडण करणार्या मुलांना समजून सांगून भांडण मिटविले व घटनास्थळावरून काढून दिले होते. त्याचवेळी भांडण करणार्यांपैकी राजू फुलारी याने चत्तर यांना उद्देशून, ‘मला तुम्हाला काही बोलायचे आहे,’ असे म्हणून थांबविले व त्यांच्यासोबत बोलत होता. त्याचवेळी तेथे दोन दुचाकी व दोन काळ्या रंगाच्या गाड्या आल्या. त्यातील एका गाडीच्या पाठीमागील काचीवर देवास असे लिहिलेले होते व त्या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या शेजारील शीटवर नगरसेवक स्वप्निल शिंदे बसलेला होता. त्या गाड्यातून काही मुले खाली उतरले व गाड्या निघून गेल्या. उतरलेल्या मुलांनी चत्तर यांच्यावर लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुश चत्तर यांच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.