अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते अंकुश चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर सावेडी उपनगरातील एकविरा चौकात शनिवारी रात्री लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चत्तर यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात सोमवारी पहाटे मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर वाढीव कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे (वय 40 रा. श्रमिक बालाजी चौक, सावेडी), अक्षय हाके (वय 33 रा. नंदनवननगर, सावेडी), अभिजीत बुलाख (वय 33 रा. गजराज फॅक्टरीजवळ, भिस्तबाग), महेश कुर्हे (वय 28 रा. साईनगर, वाघमळा, सावेडी), सुरज उर्फ विकी राजन कांबळे (वय 25, रा. भुतकरवाडी, सावेडी), मिथुन धोत्रे (वय 23 रा. पवननगर, भिस्तबाग, सावेडी) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना सोमवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात दिवस (24 जुलैपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवारी रात्री चत्तर यांच्या शेजारी राहणार्या एका मुलाचे एकविरा चौकात काही मुलांसोबत भांडण झाले होते. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या चत्तर यांच्यावर नगरसेवक शिंदेंसह त्यांच्या साथीदारांनी लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने खुनी हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चत्तर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात आले. सोमवारी दुपारी शोकाकूल वातावरणात नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी सकाळपासून सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता, एकविरा चौक परिसरात नागरिकांनी दुकाने बंद ठेवली होती. सोमवारी दिवसभर सावेडीत तणावपूर्ण परिस्थिती होती.
टोळीवर गुन्ह्यांची जंत्री
नगरसेवक असलेला स्वप्निल शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द खून, खुनासह जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. तसेच अभिजीत बुलाख विरूध्द एक, सुरज कांबळे विरूध्द सहा, महेश कुर्हे विरूध्द एक, मिथुन धोत्रे विरूध्द एक असे गुन्हे दाखल आहेत.
एलसीबी पथकाची कामगिरी
निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे, हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, अंमलदार भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, भीमराज खर्से, बाळु खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, चंद्रकांत कुसळकर, अरूण मोरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बाळासाहेब मुळीक, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, विशाल दळवी, संदीप दरंदले, फुरकान शेख, विशाल गवांदे, रोहित येमुल, रवींद्र घुगांसे, सागर ससाणे, प्रशांत राठोड, अर्जुन बडे यांनी सदरची कामगिरी केली.
शिंदे टोळी वाशिममध्ये पकडली
चत्तर यांच्यावर हल्ला होताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबी पथकाला समांतर तपासाबाबत सूचना केल्या होत्या. त्यासाठी निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेगवेगळी पथके करण्यात आली होती. या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व खबर्यामार्फत हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला. हल्लेखोर नगर, शेवगाव, पैठण, बिडकीन मार्गे वाशिमकडे गेल्याचे तपासातून समोर आले. त्यानुसार एलसीबी पथकाने वाशिम गाठले. सीसीटीव्हीत आलेली कार वाशिम परिसरातील हॉटेल गुलाटीचे बाहेर उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या हॉटेलच्या रूममधून नगरसेवक शिंदेंसह पाच जणांना ताब्यात घेतले. मिथुन धोत्रे व एका अल्पवयीन मुलाला एलसीबीच्या दुसर्या पथकाने रांजणी, बेल्हे (ता. जुन्नर) येथून ताब्यात घेतले. तर तोफखाना पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.