अहिल्यानगर (प्रतिनिधी)
नेप्ती नाका येथील बाकडावर बसलेल्या व्यावसायिकावर तरूणाने तलवारीने हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न केला. गुरूवारी (10 ऑक्टोबर) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. फिरोज बाबामीया शेख (वय 50 रा. मुकुंदनगर) असे हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश बाळासाहेब रोहकले (रा. वारूळाचा मारूती, नालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
फिरोज वाहन खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना गुरूवारी कल्याण येथे जायचे असल्याने ते दुपारी साडेतीन वाजता त्यांची दुचाकी (एमएच 16 एबी 960) घेऊन दिल्ली गेट मार्गे नेप्ती नाका येथे गेले. तेथे सम्राट वडापावच्या गाडी जवळ त्यांनी दुचाकी पार्क केली व तेथील लोखंडी बाकडावर बसले.
त्यांना पुढे जाण्यासाठी अर्धा तास बाकी होता व त्यांना एका वाहनाचे कागदपत्रे मिळणार होते. ते कागदपत्र घेऊन येणार्याची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात मंगेश रोहकले याने त्याच्याकडील लोखंडी तलवारीने फिरोज यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खूनाचा प्रयत्न केला. जखमी फिरोज यांना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने रिक्षातून उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मंगेशने फिरोजवर हल्ला का केला हे समजू शकले नाही. काही एक कारण नसताना हल्ला केला असल्याचे फिरोज यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करत आहेत.