अहमदनगर (प्रतिनिधी)
शिरूरमध्ये गावठी कट्ट्यातुन वृध्दावर गोळीबार करत घरफोडी करून चोरीचे सोने विक्रीसाठी नगरला घेऊन येणार्या दाम्पत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोन्याच्या दागिन्यासह पकडले आहे. मिलिंद ऊर्फ मिलन्या ईश्वर भोसले (वय 25) आणि त्याची पत्नी कोमल मिलिंद भोसले (वय 20, दोघे रा. बेलगाव, ता. कर्जत) असे अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
शिरूरमधील जांभळकर वस्तीवरील घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी नगर- सोलापूर रस्त्याने घेऊन दोघे येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुरूवारी (दि. 27) मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांच्या पथकास चांदणी चौकात सापळा लावण्यास सांगितले.
संशयीत तरूण व महिला हातात पिशवी घेऊन येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांना शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिलंद भोसले याने पारनेरमध्ये 2021 आणि श्रीगोंदे तालुक्यात 2023 मध्ये घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. तसेच त्याच्याविरूध्द नगर तालुका, एमआयडीसी, आष्टी (जि. बीड) पोलीस ठाण्यात चोर्या, घरफोड्या, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.