अहमदनगर (प्रतिनिधी)
‘विप्रो’ अॅपव्दारे पैसे गुंतवणूक करून अधिक नफा देण्याच्या बहाण्याने श्रीरामपूर येथील एका तरुणाला १६ लाख ५१ हजार ३०१ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अमित त्रिंबक बाचल (वय २८ रा. गुरूनानकनगर, गोंधवणी रोड, श्रीरामपूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.
१३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी बाचल यांनी २५ ऑगस्ट रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका व्हॉट्सअप मोबाईल नंबर धारक विना नावाच्या महिलेविरूध्द भादंवि ४१९, ४२० सह आयटी अॅक्ट ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
विना नावाच्या महिलेने बाचल यांना संपर्क केला. ‘विप्रो’ कंपनीतून बोलते, असे सांगून बाचल यांचा विश्वास संपादन केला. सदर महिलेने ‘विप्रो’ अॅपव्दारे पैसे गुंतवणूक करून अधिक नफा देण्याचा बहाणा करून १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान बाचल यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख ५१ हजार ३०१ रुपये घेतले.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे बाचल यांच्या लक्षात येताच त्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.