अहमदनगर (प्रतिनिधी)
पॉलीकॅब व आरआर कंपनीच्या नावाने बनावट केबलची विक्री होत असलेल्या भुमरे गल्लीतील महाराजा एजन्सी या दुकानावर कोतवाली पोलीस व कंपनीच्या प्रतिनिधींनी गुरूवारी (दि. 10) छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे ऑपरेशन हेड रेवणनाथ विष्णु केकान (वय 40 रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
महाराजा एजन्सीचा मालक दीपक हिम्मतराव देवासी (रा. नेप्ती नाका) व मॅनेजर प्रल्हाद राम सावलाराम देवासी (मुळ रा. राज्यस्थान, हल्ली रा. नेप्ती नाका) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भुमरे गल्लीत महाराजा एजन्सी दुकानात पॉलीकॅब व आरआर कंपनीच्या नावाने बनावट केबलची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे ऑपरेशन हेड केकान यांना मिळाली होती. त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधला. कोतवाली पोलिसांच्या मदतीने गुरूवारी भुमरे गल्लीतील महाराजा एजन्सी दुकानावर छापा टाकून कारवाई केली. त्या दुकानातून 65 हजार 200 रूपये किंमतीचे बनावट केबल जप्त करण्यात आले आहे. दोघांविरूध्द कॉपीराईट अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.