अहमदनगर (प्रतिनिधी)
नवरात्रौत्सवामुळे केडगाव देवी मंदिर येथे देवदर्शनासाठी दररोज भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन आलेल्या भाविकांचे दागिने व पैशांची चोरी करणारी टोळी या परिसरात कार्यरत होती. त्या टोळीतील सात महिलांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. पोलीस ठाण्यात दोन महिलांवर चोरीचा प्रयत्न केल्याचा व एका महिलेवर चोरी केल्याचा आणि पाच महिलांवर संशयास्पद चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
अमृता भिमराज काळे (वय 22, रा. समतानगर, नगर), प्रतीक्षा प्रदीप काळे (वय 22, रा. अंबिका कॉलनी, केडगाव), रिना बाळु भोसले (रा. अंबिकानगर, केडगाव), सुनिता चैतराम सोळंखी (वय 30, रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता, नगर), सुरज श्रीखंड चव्हाण (वय 20, रा. समतानगर केडगाव), कविता अंकल भोसले (वय 30), शिवकन्या विशाल भोसले (वय 19, दोघी रा.भानसहिवरे ता. नेवासा) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
नवरात्रौत्सवामुळे केडगाव देवी मंदिर येथे देवदर्शनासाठी येणार्या महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांच्या गळ्यातील दागिने व पर्स मधील पैसे चोरीचे प्रकार सुरू असल्याने पोलीस निरीक्षक यादव व त्यांच्या पथकाने संशयित महिलांवर लक्ष ठेवले होते. मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. तसेच समांतर गस्त सुरू असून मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसरात कोतवाली पोलीस गस्त करत असताना काही महिला संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्या. चोरी करणार्या आणि चोरीच्या उद्देशाने फिरणार्या दोन टोळ्यातील सात महिलांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले व त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक गणेश इंगळे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, अभय कदम, अमोल गाडे, गणेश धोत्रे, संदीप थोरात, विश्वास गाजरे, रवी टकले, सत्यम शिंदे, प्रमोद लाहरे, तानाजी पवार, सोनाली भागवत, स्वाती तोरडमल, पूजा दिक्कत, सविता शेंडगे, गृहरक्षक दलाचे निलेश गजरे, प्रतीक ठोंबरे, सुषमा मोरे, शितल रोकडे यांनी ही कारवाई केली.