अहमदनगर (प्रतिनिधी)
प्रवाशाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत पाच हजार रूपये आणि मोबाईल लुटणार्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोतवाली पोलिसांनी पुणे बसस्थानक परिसरात पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अकिब उर्फ चुस्या जिशान सय्यद (वय 30, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
भगवंत नागराज थोरात (वय 42, रा. नाशिक) यांना माळीवाडा बसस्थानकाजवळ दोन चोरट्यांनी दुचाकीवर बसवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करत पाच हजाराची रोख रक्कम व मोबाईल चोरला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. पोलीस निरीक्षक यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा अकिब सय्यद याने केला असून तो पुणे बसस्थानक परिसरात येणार आहे. त्याला पकडण्यासाठी पुणे बसस्थानक परिसरात कोतवाली पोलिसांनी सापळा लावला होता. पोलिसांची चाहूल लागताच त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने सारसनगर या परिसरापर्यंत पाठलाग करून त्याला जेरबंद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी पुढील तपास करीत आहेत.