अहमदनगर (प्रतिनिधी)
तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व गोमांस विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असून संबंधीत व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेप्ती नाका येथील गोरख रामभाऊ घोडके (वय 45) याला दारू विकताना पकडले. त्याच्याकडून दोन हजार 450 रूपयांची दारू जप्त केली आहे. तसेच मस्तान शहा चौक, कोठला येथे दारू विक्री करणारा सत्तार अब्दुल कादर (वय 64) याला पकडले असून त्याच्याकडून तीन हजार 100 रूपये किमतीची हातभट्टी दारू जप्त केली आहे. तसेच एलसीबी पथकाने लालटाकी, झोपडपट्टी येथील गाळ्यात छापा टाकून महमंद बाबुलाल कुरेशी (वय 34 रा. दौलावडगाव, ता. नगर) व रिजवान जमीर कुरेशी (वय 32 रा. झेंडीगेट) यांना गोमांस विक्री करताना पकडले. त्यांच्याकडून गोमांस व इतर साहित्यासह आठ हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अविनाश वाकचौरे, अहमद इनामदार, वसिम पठाण, सुरज वाबळे, संदीप धामणे, सतिष त्रिभुवन, शिरीष तरटे, सचिन जगताप, दत्तात्रय कोतकर, गौतम सातपुते, सतिष भवर, संदीप गिर्हे यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली.