Saturday, July 27, 2024
Homeनगरमालाचे तीन लाख घेऊन टेम्पो चालक पसार

मालाचे तीन लाख घेऊन टेम्पो चालक पसार

अहमदनगर (प्रतिनिधी)

व्यावसायिकाने विश्‍वासाने टेम्पोत भरून दिलेल्या अ‍ॅल्युमिनीअमच्या पट्ट्या शेवगाव येथे खाली केल्यानंतर त्या मालाचे मिळालेले तीन लाख रूपये घेऊन टेम्पो चालक पसार झाला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच व्यावसायिकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यशवंत सोन्याबापू धामणे (वय 46 रा. कानडे मळा, सारसनगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

- Advertisement -

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक प्रतीक यशूदास कळकुंबे (रा. कानडे मळा, सारसनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धामणे यांचे कानडे मळा, सारसनगर येथे न्यु शनिराज ट्रेडर्स या नावाने दुकान आहे. त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी कळकुंबे याच्या टेम्पो मध्ये तीन लाख रूपये किमतीच्या अ‍ॅल्युमिनीअमच्या पट्ट्या भरून दिल्या होत्या. त्या पट्ट्या शेवगाव येथील आखेगाव रस्त्यावरील शुभम अ‍ॅल्युमिनीअम या दुकानात खाली करण्यास त्याला सांगितले होते.

कळकुंबे याने ऑर्डरप्रमाणे सदरच्या पट्ट्या शुभम अ‍ॅल्युमिनीअमच्या दुकानात खाली केल्या. दुकानाचे मालक कल्पेश लाहोटी (रा. शेवगाव) यांच्याकडून कळकुंबे याने तीन लाख रूपये घेतले. दरम्यान, सदर मालाचे पैसे त्याने धामणे यांना न देता तो पैसे घेऊन पसार झाला आहे. दोन ते तीन दिवस धामणे यांनी त्याची वाट पाहिली. परंतू तो पैसे घेऊन न आल्याने अखेर धामणे यांनी गुरूवारी (दि. 2) रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सहाय्यक फौजदार बी.बी.अकोलकर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या