अहमदनगर | प्रतिनिधी
शहर व उपनगरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.
पीडित अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रेल्वे स्टेशन रस्ता परिसरात राहणार्या रिक्षा चालकाने गुरूवारी (26 सप्टेंबर) कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची अल्पवयीन मुलगी (वय 15) गुरूवारी सकाळी 11 वाजता शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली.
दरम्यान दुपारी एक पर्यंत ती शाळेतून घरी आली नसल्याने फिर्यादी यांनी तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही. त्यांनी रात्री 11 वाजता कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत राहणार्या एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला (वय 14) अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून बुधवारी (25 सप्टेंबर) दुपारी दोन ते रात्री आठच्या दरम्यान पळवून नेले.
सदरचा प्रकार फिर्यादीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. फिर्यादी यांनी दुसर्या दिवशी गुरूवारी (26 सप्टेंबर) सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत घटना सांगितली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.