अहमदनगर । प्रतिनिधी
इंडीयन ट्रेडमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची दोन लाख 59 हजार 61 रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. लक्ष्मण विश्वनाथ भोंगळ (मुळ रा. जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी, हल्ली रा. हुंडेकरी शोरूम जवळ, सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी गुरूवारी (18 जुलै) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना ऑक्टोबर 2023 ते 6 जानेवारी 2024 दरम्यान घडली असून फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर भोंगळ यांनी सुरूवातीला नॅशनल सायबर क्राईम रिपोटींग पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या चौकशीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये फिर्यादी त्यांच्या सावेडी येथील घरी असताना त्यांना दोन वेगवेगळ्या नंबरवरून फोन आले.
हे देखील वाचा : हार्दिक-नताशाचा अखेर घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक पोस्ट
त्या फोन करणार्या व्यक्तीने तुम्हाला इंडीयन ट्रेडमध्ये नफा करून दाखवितो असे म्हणून भोंगळ यांना एक ट्रेड विकत घेण्यास सांगितले व त्या ट्रेडवर नफा झाल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या व्यक्तीने भोंगळ यांना वेळोवेळी ट्रेडवर नफा करण्याचे खोटे कळवून दोन लाख 59 हजार 61 रूपये रक्कम पाठविण्यास भाग पाडले.
भोंगळ यांनी त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कोटक महिंद्रा, एचडीएफसी, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, फिनो पेमेंट, यस, आयसीआयसी, अॅक्सेस, फेडरल या बँकेच्या खातेदारांना पैसे पाठविले. त्या व्यक्तीने पाठविलेले पैसे काढून घेतले व पुन्हा परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर भोंगळ यांनी तक्रार दाखल केली. महिला पोलीस अंमलदार संजीवनी नेटके अधिक तपास करत आहेत.
हे देखील वाचा : हिट अॅण्ड रन! अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी