Saturday, July 27, 2024
Homeनगरअहमदनगर-दौंड महामार्गावर तीन तास रास्ता रोको

अहमदनगर-दौंड महामार्गावर तीन तास रास्ता रोको

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व समाज आंदोलनात सहभागी झाला असून शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. तर काष्टी येथे अहमदनगर – दौंड महामार्गावर तब्बल तीन तास रास्ता रोको करण्यात आले.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर दौंड महामार्गावर सकाळी दहा वाजता सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन तीन तास चालू होते. यामुळे दोन्ही बाजूने शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आंदोलनात सकल मराठा समाजाच्यावतीने प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली. त्यांनतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज तालुका बंदची हाक दिली होती. यामुळे शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. श्रीगोंदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. श्रीगोंदा वकील संघाच्या प्रतिनिधी मंडळानेही तहसीलदार यांना निवेदन देऊन तातडीने आरक्षण प्रश्न सोडण्याची मागणी केली आहे. वकील संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वकील निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले, 1991 साली मी मंत्री असताना माझ्या दालनात मराठा आरक्षणाची बैठक झाली होती. मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक अहवाल तयार करून शासनाला पाठविला होता. तेव्हापासून आजपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मराठा आरक्षणावर दोन दिवसांत योग्य तो निर्णय न झाल्यास मी सकल मराठा समाजाच्यावतीने श्रीगोंदा येथे होणार्‍या साखळी उपोषणात सहभागी होणार.

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, झोपलेल्या सरकारने योग्यवेळी योग्य दखल न घेतल्याने मनोज जरांगे यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ आणली. आता आक्रमक झालेला मराठा समाज थांबणार नाही. या झोपलेल्या सरकारला जाग आणून देण्याचे काम करण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना त्यांना गांभीर्य नाही. त्यामुळे उपोषणात मी सुद्धा सहभागी होऊन उपोषण करणार आहे.

यावेळी घनश्याम शेलार, टिळक भोस, मनोहर पोटे, दीपक भोसले, आपचे राजेंद्र नागवडे, राजेंद्र म्हस्के, अरुण पाचपुते, चांगदेव पाचपुते, शशी जाधव, संजय काळे, अरविंद कापसे, सुदाम कुटे, संतोष इथापे, श्याम जरे, बाळासाहेब बळे, अजीम जकाते, दिलीप लबडे, गोकुळ फराटे, यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले.यावेळी कैलास पाचपुते, अनिल पाचपुते, साजन पाचपुते, अरुण पाचपुते, राकेश पाचपुते, प्रताप पाचपुते, सुनील दरेकर, अनिल कोकाटे, योगेश भोईटे, बंडूतात्या जगताप, दीपक भोसले, विठ्ठल काकडे, आबासाहेब जगताप, राजेंद्र म्हस्के, सतिष मखरे, सुवर्णा पाचपुते, संगीता मखरे, गणेश भोस, मिलींद दरेकर, वैभव पाचपुते, भारती इंगवले, माया खेंडके, अरविंद कुरुमकर यांच्यासह सकल मराठा समाज उपस्थित होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या