अहमदनगर | प्रतिनिधी
गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या 9 महिन्यांत जिल्ह्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या 230 आहे. यातील दोनशेहून अधिक रुग्ण केवळ गेल्या तीन महिन्यांतील आहेत. त्यामुळे परिसरात, घरात स्वच्छता ठेवून डासांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दरम्यान, सध्या दिवसा पडणारे उन, रात्री ते पहाटेपर्यंत वाढलेला गारवा, पावसामुळे सर्वत्र वाढलेले गवत यातून मोठ्या प्रमाणात वाढलेली डासांची उत्पत्ती ही जिल्ह्यात व्हायरल आणि कीटकजन्य आजार वाढवत आहे. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुणीया आणि व्हायरल तापाचे रुग्ण वाढले आहे. यात सर्वात घातक डेंग्य असून त्याविषयी जिल्ह्यात सगळीकडे डेंग्यूविषयी जगजागृती करून आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले जात आहे.
हे हि वाचा : जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर
डेंग्यूची प्रमुख लक्षणे ताप, अंगदुखी आणि थकवा आहे; पण तज्ज्ञांच्या मते आता डेंग्यूमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. कारण, मेंदूशी संबंधित दीर्घकाळ आजार धोकादायक ठरू शकतात. जिल्ह्यात 1 जानेवारी ते 18 सप्टेंबर 2024 या काळात एकूण 230 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यात जुलैत 48, ऑगस्टमध्ये 97, तर सप्टेंबरमध्ये 62, असे एकूण 207 रुग्ण केवळ तीन महिन्यांत आढळले आहेत. तर इतर 23 रुग्ण गेल्या सहा महिन्यांतील आहेत.
ही आहेत डेंग्यूची लक्षणे
रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, हाडे आणि सांध्यांमध्ये वेदना, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे, अशी लक्षणे दिसू शकतात. तापासोबतच रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होतेच, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणे, सतत तहान लागणे आणि अशक्तपणा अशी डेंग्यूची लक्षणे दिसू शकतात.
हे हि वाचा : चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीकडून…
अशी घ्या काळजी
एडिस प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळे घरात एसी, फ्रीजखाली साचलेले पाणी, फुलदाण्या, कुलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर, छतावरील भांडे, साहित्य यात पाणी साचू देऊ नये. घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळावी. डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात, त्यामुळे आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाऊ नये. घरांच्या खिडक्यांना जाळी लावावी, दारे-खिडक्या बंद ठेवाव्यात, अंगभर कपडे वापरावेत, शाळांचा परिसर स्वच्छ ठेवावा.
परिसरात डास होणार नाहीत, यादृष्टीने स्वच्छता बाळगावी. डेंग्यूचा डास शक्यतो दिवसा चावतो. त्यामुळे खबरदारी घ्यावी. रांजण, हांडे, हौद किंवा इतर पाणी असणारे साहित्य आठवड्यातून एकदा कोरडे करावे. लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परस्पर औषधे घेणे टाळावीत. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. – डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अधिकारी.