Friday, November 15, 2024
Homeनगरजिल्ह्यात 12 मतदारसंघांत 37 लाख 60 मतदार, 3 हजार 763 मतदान केंद्र

जिल्ह्यात 12 मतदारसंघांत 37 लाख 60 मतदार, 3 हजार 763 मतदान केंद्र

यंदा 40 दिवसांची आचारसंहिता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया होणार असून त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात 12 मतदारसंघांत 37 लाख 60 हजार 512 मतदार असून 3 हजार 763 मतदान केंद्र आहेत. निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात कालपासून (दि.15 ऑक्टोबर) ते मतदान प्रक्रिया होवून मतमोजणी प्रक्रिया (दि. 23 नाव्हेंबर) होईपर्यंत 40 दिवसांची आचारसंहिता राहणार आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दाखल करणे, दाखल अर्जाची छाननी, माघार, प्रत्यक्षात मतदान तसेच त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात विधानसभेचे 12 मतदारसंघ असून त्याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असणार्‍या कर्मचार्‍यांना येत्या दोन दिवसात नेमणुकीचे आदेश देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 18 ते 19 हजार कर्मचार्‍यांसह दहा टक्के राखीव कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या कर्मचार्‍यांना 27 किंवा 28 तारखेला निवडणुकीचे प्रथम प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान अधिकार्‍यासह पाच कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 12 मतदान मतदारसंघात 3 हजार 763 मतदान केंद्र असून लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली होती असे मतदान केंद्रावर मतदारांसाठी ‘आनंददायी’ मतदान केंद्र उभारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. मतदानाच्यावेळी जिल्ह्यात एकूण असणार्‍या मतदान केंद्रापैकी 50 टक्के म्हणजेच 1 हजार 884 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मतदानासाठी जाणे अशक्य नसणार्‍या 85 वर्षावरील अथवा 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणार्‍या, तसेच कोविड बाधित रूग्णांना घरून मतदानाची सोय करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 85 वर्षे पेक्षा अधिक वय असणारे 55 हजार मतदार आहे. यांनी मागणी केल्यास त्यांना घरून मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामुळे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश सालीमठ यांनी यावेळी दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नगरला झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर रोडे आदी उपस्थित होते.

योजनांचे शासकीय फलक होणार गायब
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून येत्या 24 तासात शासकीय कार्यालयातील योजनांचे शासकीय फलके, तसेच 48 ते 72 तासात निमशासकीय कार्यावरील योजनांचे फलक काढण्यात येणार आहे. तसेच निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती तीन वेळा मतदारांना द्यावी लागणार आहे.

पोलिसांची प्रत्येक गोष्टीवर राहणार नजर : एसपी ओला
लोकसभा निवडणुकीत पोलिसांनी पकडलेल्या लाखो रूपयांची रकमेचा तपास सुरू असून याबाबतची माहिती आयकर खात्याला कळविण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाची कायदा सुव्यवस्थेची पहिली बैठक झालेली असून लवकरच पुढील नियोजन करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत दाखल गुन्ह्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात निवडणूक काळात अवैध दारू शस्त्रे, तसेच बेकायदा पैशाची वाहतूक करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यात येणार असून यासाठी आजपासून विधानसभानिहाय भरारी पथके कार्यरत झाली आहेत. निवडणूक काळात पोलीस प्रशासन प्रत्येक गोष्टीवर करडी नजर ठेवणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहा पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार यांच्यावर करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाई यासह पुढील काळात करण्यात येणार्‍या विविध उपायोजना यांची माहिती दिली.

निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डला अहमदनगर नाव

केंद्र आणि राज्य सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले असले तरी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत नगर जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच आहे. यामुळे निवडणूक काळात नगरची माहिती सर्व अहमदनगर या नावाने प्रसिध्द होणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डला जिल्हा आणि शहर मतदारसंघाचे नाव अहमदनगर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असे आहे मतदान यंत्रे
विधानसभेच्या 12 मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी 8 हजार 531 बीयु, 4 हजार 779 सीयु, 5 हजार 155 व्हीव्हीपॅड प्राप्त झाले असून त्यांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झालेली आहे. विधानसभा मतदारसंघासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्र तपासून लवकरच त्या-त्या मतदारसंघाला सरमिसळ करून पाठवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील मतदारसंघासाठी पुरसे मतदान यंत्रे असल्याचे सांगण्यात आले.

असे आहेत मतदार
जिल्ह्यात 12 मतदारसंघात 3 हजार 763 मतदान केंद्र असून याठिकाणी 19 लाख 36 हजार 900 पुरूष मतदार तर 18 लाख 23 हजार 411 स्त्री मतदार, तसेच 201 इतर असे 37 लाख 60 हजार 512 मतदार आहेत. यात 9 हजार 686 सैनिक मतदार असून त्यात 9 हजार 376 पुरूष आणि 310 महिला सैनिक मतदार आहेत.

हे आहेत निवडणूक निर्णय अधिकारी
अकोले उपजिल्हाधिकारी रोहियो अनुप यादव, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, कोपरगाव उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3 सायली सोलंके, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी किरण पाटील, नेवासा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 14 अरूण उंडे, शेवगाव उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, राहुरी शाहूराज मोरे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, अहमदनगर शहर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, श्रीगोंदा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 15 गौरी सावंत, कर्जत- जामखेड उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांचा समावेश आहे.

हे आहेत आहेत समन्वय अधिकारी
बाळासाहेब कोळेकर अप्पर जिल्हाधिकारी आचारसंहिता कामकाज. अतुल चोरमारे उपजिल्हाधिकारी मतदान प्रक्रियेसाठी लागणारे अधिकारी कर्मचारी नियुक्ती व कामकाज. शारदा जाधव उपजिल्हाधिकारी मतदान यंत्र विषयक कामकाज. हेमलता बडे पुरवठा अधिकारी निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य पुरवठा कामकाज. शैलेश मोरे मुख्य वित्त व लेखाधिकारी जिल्हा परिषद खर्च लेखापरीक्षण कामकाज. अतुल चोरमारे मतपत्रिका टपाली कामकाज. अतुल चोरमारे मतदान अधिकारी कर्मचारी यांना सुविधा उपलब्ध करून देणे. डॉ. बापूराव नागरगोजे जिल्हा आरोग्य अधिकारी मतदान अधिकारी कर्मचार्‍यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. गजानन नकासकर संगणक, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा. अशोक कडूस शिक्षणाधिकारी स्वीप समिती. भास्कर पाटील शिक्षणाधिकारी मतदानासाठी कर्मचारी अधिकारी प्रशिक्षण. सचिन डोंगरे तहसीलदार निवडणुकीस आवश्यक वाहतुकीचे काम नियोजन. आकाश दहाडदे तहसीलदार जिल्हा निवडणूक आराखडा कामकाज. किरण मोघे जिल्हा माहिती अधिकारी प्रसार माध्यम विषयक कामकाज. हिमालय घोरपडे तहसीलदार समन्वयक विषय कामकाज. सपना वसावा उपायुक्त प्रशासन मनपा वोटर हेल्पलाइन. दीपक दातीर प्रभारी नियोजन अधिकारी नोडल ऑफिसर निरीक्षक. आशिष नवले मुख्य व्यवस्थापक जिल्हा अग्रणीय बँक सूक्ष्म निरीक्षक नियुक्ती व प्रशिक्षण. देविदास कोकाटे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिव्यांग कर्मचार्‍यांना आवश्यक सोयी सुविधा पुरवणे. प्रशांत गोसावी नायब तहसीलदार मतदार यादी व्यवस्थापन विषयक कामकाज आणि प्रमोद सोनवणे यांच्याकडे अन्य कामे सोपवण्यात आलेली आहेत.

15 हजार जणांवर प्रतिबंधक कारवाई
आगामी विधानभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे 15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. तसेच काहीजणांवर तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तर काहींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात गुन्हेगार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात 1 लाख 93 हजार 876 पुरूष आणि 1 लाख 78 हजार 594 महिला असे सर्वाधिक 3 लाख 72 जार 476 हजार 743 मतदार आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघात 1 लाख 38 हजार 845 पुरूष, 1 लाख 27 हजार 283 महिला असे 2 लाख 66 हजार 129 मतदार आहेत. संगमनेरमध्ये 1 लाख 47 हजार 469 पुरूष, 1 लाख 39 हजार 757 महिला असे 2 लाख 87 हजार 227 मतदार आहेत. शिर्डीमध्ये 1 लाख 48 हजार 425 पुरूष, 1 लाख 42 हजार 357 महिला, असे 2 लाख 90 हजार 790 मतदार आहेत. कोपरगावमध्ये 1 लाख 45 हजार 834 पुरूष, 1 लाख 42 हजार 571 महिला असे 2 लाख 88 हजार 411 मतदार आहेत. श्रीरामपुरमध्ये 1 लाख 55 हजार 139 पुरूष, 1 लाख 52 हजार 552 महिला असे 3 लाख 7 हजार 753 मतदार आहेत. नेवासामध्ये 1 लाख 44 हजार 993 पुरूष, 1 लाख 35 हजार 899 महिला असे 2 लाख 80 हजार 896 मतदार आहेत. राहुरीमध्ये 1 लाख 66 हजार 762 पुरूष, 1 लाख 54 हजार 325 महिला असे 3 लाख 21 हजार 88 मतदार आहेत. पारनेरमध्ये 1 लाख 79 हजार 768 पुरूष, 1 लाख 68 हजार 802 महिला असे 3 लाख 48 हजार 573 मतदार आहेत. नगर शहरमध्ये 1 लाख 69 हजार 724 पुरूष, 1 लाख 54 हजार 748 महिला असे 3 लाख 14 हजार 579 मतदार आहेत. श्रीगोंदामध्ये 1 लाख 75 हजार 467 पुरूष, 1 लाख 61 हजार 926 महिला असे 3 लाख 37 हजार 395 मतदार आहेत तर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाख 80 हजार 598 पुरूष, 1 लाख 64 हजार 597 महिला असे 3 लाख 45 हजार 195 मतदार आहेत.

आदर्श, महिला, युवक व दिव्यांग मतदान केंद्र
जिल्ह्यात नियमित मतदान केंद्रास 36 आदर्श, 12 महिला संचलित 12 दिव्यांग, 12 युवा आणि 147 पडदानशील (मुस्लीम महिलांचे) मतदान केंद्र आहेत. यात सर्वाधिक पडदाशीन नेवासा तालुक्यात 20 असून सर्वात कमी कर्जत-जामखेड तालुक्यात अवघे 2 आहेत. यासह प्रत्येक तालुक्यात 3 याप्रमाणे नगर जिल्ह्यात 36 आदर्श मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र मतदान केंद्र राहणार आहेत. तर प्रत्येक ठिकाणी खास युवकांसाठी युवक संचलित मतदान केंद्र राहणार आहेत.

निवडणुकीसाठी विविध समित्या
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून यात माध्यम प्रामाणिकरण व सनियंत्रण समितीसह अचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत कायदेशीर प्रक्रिया राबवून जप्त करण्यात येणारे पैसे, मौल्यवान वस्तू यांची चौकशी करून निवडणूक प्रकियेशी संबंध नसल्यास ती परत करण्यासाठी समितीचा समावेश आहे. या समित्यामध्ये जिल्हाधिकारी सालीमठ यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश ओला, सर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह अन्य अधिकारी यांच्या समावेश आहे.

याठिकाणी दाखल करता येणार अर्ज
अकोले तहसील कार्यालय (नवीन), संगमनेर उपविभागीय कार्यलय, शिर्डी- राहाता प्रशासकीय कार्यालय, कोपरगाव सुनावणी कक्ष तहसील कार्यालय, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, नेवासा तहसील कार्यालय (नवीन), शेवगाव तहसील कार्यालय, राहुरी जुने सेतू कार्यालय राहुरी, पारनेर तहसील कार्यालय, अहमदनगर शहर तहसील कार्यालयासमोरील मुख्य प्रशासकीय इमारत सावेडी, श्रीगोंदा तहसील कार्यालय, कर्जत- जामखेड तहसील कार्यालय याठिकाणी उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या