अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गेल्या 15 दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यामुळे प्रकाश झोतात आलेली जिल्हा सहकारी बँकेची आज शुक्रवारी (दि. 27) रोजी दुपारी एक वाजता सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेकडे नगर जिल्ह्यासह राज्याच्या नजरा राहणार आहेत. बँक प्रशासन आणि संचालक मंडळ सध्या वेगवेगळ्या आर्थिक निर्णयासह सहकार खात्याच्या चौकशीच्या भोवर्यात असून त्यावरून काही संचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही नाराजी आजच्या सर्वसाधारण सभेत संबंधित शब्दाच्या रुपाने व्यक्त करणार की ते गप्प राहणे पसंत करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत संचालक बोलले तरीही आणि मौन बाळगले तरीही त्याची जिल्हाभर चर्चा होणार आहे.
नगर जिल्हा बँकेची 2023-24 आर्थिक वर्षाची 67 वी सर्वसाधारण आज शुक्रवारी सभा होत आहे. दरवर्षीप्रमाणे या सभेला जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून सभासद उपस्थित राहत प्रश्न मांडणार आहेत. दरम्यान, गेल्या काही काळापासून जिल्हा बँक आणि संचालक मंडळाने घेतलेले विविध निर्णय चर्चेत असून सहकार खात्याने या निर्णयाची चौकशी सुरू केलेली आहे. बँकेच्या 18 ते 20 मुद्यावर सहकार खात्याला आक्षेप असून त्यावर बँकेच्यावतीने त्यांचे म्हणणे सहकार खात्याने नेमलेल्या विशेष लेखा परीक्षक यांना सादर करण्यात आलेले आहे. मात्र, अद्याप चौकशी करणारे विशेष लेखा परीक्षक यांनी अंतिम चौकशी अहवाल नाशिकचे सहनिबंधक यांना सादर केलेला नाही. दरम्यान, आजच्या सभेच्यानिमित्ताने बँकेचे निर्णय सभासदांच्या कोर्टात पोहचणार असून त्याठिकाणी सभासदच यावर काय भूमिका घेणार याची उत्सुकता जिल्ह्याला आहे.
नगर जिल्हा बँकेला मोठी परंपरा असून याठिकाणी जिल्ह्याचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात आले असल्याचे सभासद, शेतकर्यांनी अनुभवलेले आहे.
मात्र, मागील काही वर्षात बँकेच्यावतीने वाटप करण्यात आलेले विविध कर्ज यासह शेती कर्जाची वसुली याबाबत राज्य सरकारची धरसोड वृत्तीचा काही प्रमाणात फटका जिल्हा बँकेला बसला असल्याचे काही संचालकांचे म्हणणे आहे. तसेच बँकेच्या काही निर्णयांना प्रशासन आणि अधिकार्यांनी संचालक मंडळाला स्पष्टपणे विरोध करणे आवश्यक होते. मात्र, संभाव्य धोक्याकडे बँकेच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. यामुळे आजच्या होत असलेल्या सर्वसाधारण सभेत कोण काय बोलणार? कोण कोणते मुद्दे उपस्थित करणार?, संचालक मंडळ, बँक प्रशासनाच्यावतीने त्यावर काय खुलासा होणार याकडे सर्वांच्या नजरा राहणार आहेत. जिल्हा बँकेच्या ‘अर्थ’कारणाचा विषय राज्य पातळीपर्यंत पोहचला असून सहकार विभागाच्या चौकशीचा गुंता वरिष्ठ पातळीवरून सोडण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहेत. दुसरीकडे बँकेच्या 700 जागांची भरती आणि त्यासाठी नेमण्यात आलेली कंपनी आणि भरतीचे नियम याबाबत संशय व्यक्त होत असल्याने आजच्या सभेत त्यावर काय खुलासा होणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
बँकेवर उच्चपदस्थ अधिकार्यांची गरज
हजारो कोटींच्या ठेवी, निधी, खेळते भागभांडवल यासह 287 शाखांचे ग्रामीण भागात जाळे असणार्या बँकेवर राज्य सरकारच्यावतीने उच्चपदस्थ दर्जाच्या अधिकार्यांची नेमणूक होण्याची मागणी काही संचालकांनी व्यक्त केली आहे. भविष्यात संचालक मंडळाने काहीही निर्णय घेतले तरी शेतकरी, सभासद हित पाहून संबंधित अधिकारीच तटस्थ निर्णय घेत बँकेचे नुकसान टळेल. यामुळे भविष्यात राज्य सरकार राज्यातील नगरसह बड्या सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.