अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेबाबत सध्या उठवण्यात येत असलेल्या वावड्यात अर्थ नाही. जिल्हा बँक ही सक्षम असून जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. बँकेच्या राजकारणात विरोधी मंडळाची सत्ता असल्याने अशा प्रकारे बँकेची बदनामी करण्यात येत आहे. तुमच्या ताब्यात सत्ता असली बँक उत्तम चालते, या शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टीका केली.
नगरमध्ये माध्यमांशी बोलताना पहिल्यांदा महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हा बँकेवर भाष्य केले. जिल्हा बँक ही सक्षम आर्थिक संस्था असून शेतकर्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचे काम करत आहे. तसेच भविष्यात ती शेतकर्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार आहे. मात्र, बँकेच्या राजकारणात विरोधी विचारांचे सत्तेत संचालक मंडळ आल्याने काहींकडून जिल्हा बँकेची बदनामी करण्यात येत आहे. हा प्रकार नवीन नाही. मी अध्यक्ष असताना देखील अशा प्रकारे बँकेवर टीका करण्यात आली होती.
मात्र, विरोधकांना सुनावत (माजी मंत्री आ. थोरात यांचे नाव न घेता) तुमच्या ताब्यात बँक असली म्हणजे सर्व काही उत्तम चालते आणि दुसर्याच्या ताब्यात गेली की बँकेत घोटाळे झाले, असा प्रकार सुरू आहे. यामुळे जिल्हा बँकेवर करण्यात येत असलेल्या आरोपात अर्थ नसल्याचे स्पष्ट करत बँकेतील विरोधकांचा समाचार घेत भविष्यात जिल्हा बँक शेतकर्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार असल्याचा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.