Thursday, September 19, 2024
Homeनगरनोटाबंदीतील कोट्यवधींचे गौडबंगाल आजही अनुत्तरीत

नोटाबंदीतील कोट्यवधींचे गौडबंगाल आजही अनुत्तरीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

केंद्र सरकारने नोटा बंदी केली, त्याकाळात सामान्य नागरिकांनी रांगत उभे राहून जुन्या नोटा बँकेत जमा केल्या. यात अनेकांना त्रास सहन करावा लागला. मात्र, जिल्हा बँकेने नोटाबंदीच्या काळात कोणत्या अधिकार्‍यांनी, कोणत्या तारखेला, कोणत्या नोटा स्विकारल्या? त्याची रक्कम किती याचा तपशील जिल्हा बँकेकडे नसल्याचा आक्षेप विभागीय सहनिबंधक यांच्यावतीने घेण्यात आला आहे. यामुळे गरिबांची, कष्टकार्‍यांची आणि शेतकर्‍यांची बँक असणार्‍या जिल्हा बँकेत नोटा बंदीत 11 कोटी 68 लाखांचा गोलमाल कोणी केला हा प्रश्न आज 8 वर्षानंतरही कायम आहे.

आठ वर्षापूर्वी म्हणजेच 2016 ला केंद्र सरकाने नोटा बंदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर जिल्ह्यातील बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. नोटा बदलून मिळाव्यात यासाठी सामान्य व्यक्ती, शेतकरी उन्हातान्हात बँकांच्या रांगेत उभे असतांना जिल्हा बँकेच्या एसी रुममध्ये बसून काहींनी जुन्या नोटा बदलून घेतल्या आहेत. विशेष म्हणजे हे करत असतांना जिल्हा बँकेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी 11 कोटी 68 लाख रुपयांचा कोणताच तपशील ठेवलेला नाही. या काळात कोणत्या शाखेत, कोणी, किती नोटा जमा केल्या? त्याची रक्कम किती? याचा तपशील नसल्याचे सहकार विभागाचे म्हणणे आहे. तसेच आतापर्यंत अनेकवेळा हा विषय उपस्थित झाल्यावर जिल्हा बँकेच्यावतीने या विषयावर मौन साधण्यात आले आहे.

या विषयाची स्वतंत्र चौकशी होणे अपेक्षीत असतांना बँकेने आठ वर्षानंतर काहीही केलेले नाही. यामुळे बँकेची सुमारे 12 कोटी रुपयांची रक्कम कुंठीत झाली असून बँकेचे आर्थिक नुकसान झालेल आहे. यामुळे या प्रकारणाची चौकशी होवून संबंधीत दोषी अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचे मत विभागीय सहनिबंधक यांच्यावतीने व्यक्त करण्यात आलेले आहे. एकीकडे शेतकरी हितासाठी काम करण्याचा देखावा करणारे बँकेचे संचालक गप्प असल्याने या विषयाचे गुढ वाढले आहे. बँकेला 11 कोटी 68 लाखांचा चुना लावला कोणी, याचा शोध कोण घेणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

सीडी रेशो ओलांडला
जिल्हा बँकेेने सीडी रेशोबाबतच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. चालूवर्षी मार्च 2024 अखेर बँकेच्या ठेवी आणि कर्जाचे प्रमाण (सीडी रेशा) हे 75.632 टक्के होते. त्यानंतर एक महिन्यांत म्हणजे मे 2024 मध्ये हे प्रमाण 87.31 टक्क्यांपर्यत गेले आहे. यावरून जिल्हा बँकेेने ओव्हरट्रेडींग केले असून सीडी रेशो राखण्यात अपयशी ठरल्याचे सहकार विभागाचे म्हणणे असून त्याचा बँकेच्या अर्थकारणावर किती विपरीत परिणाम झाला याची तपासणी सध्या सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

भरतीच्या अटी-शर्तीमुळे गोची
जिल्हा बँकेच्या 700 जागांच्या भरतीच्या अटीशर्तीवर ‘सार्वमत’ ने प्रकाश टाकल्यानंतर या माहितीचे जिल्ह्यातून उमेदवारांसह अनेकांनी स्वागत केले आहे. जिल्हा बँकेचा ‘छुपा अजेंडा’ यामुळे उजेडात आला असून भरती पारदर्शक पध्दतीने कशी होईल, यासाठी वॉच ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बँकेच्या कारभाराच्या अनेक बाजू उजेडात येत असतांना अनेकांनी बँक प्रशासन आणि संचालक मंडळातील निर्णयाशी आम्ही सहमत नव्हतो, अशी भूमिका खासगीत घेण्यास सुरूवात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या