Saturday, May 18, 2024
Homeनगरबालसंगोपनासाठी नगर जिल्ह्यासाठी 5 कोटी

बालसंगोपनासाठी नगर जिल्ह्यासाठी 5 कोटी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन सहा महिने उलटल्यानंतर राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेसाठी राज्य सरकारने 36 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून नगर जिल्ह्यासाठी सर्वाधिक 5 कोटी दिले आहेत. दिवाळीच्या तोंडावर निधी उपलब्ध झाल्याने या लाभार्थींमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र या निधीचे आठवडाभरात वाटप झाले तरच लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

- Advertisement -

करोनाच्या महासंकटात महाराष्ट्रातील अनेक मुला मुलींना आपले पालक गमवावे लागले आहेत. अशा बालकांच्या शिक्षणासाठी दरमहा 1100 रुपये बालसंगोपन योजनेतून दिले जातात. हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र करोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या पाठपुराव्यानंतर अहमदनगरसह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात तालुकास्तरावर बालसंगोपन शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे एकट्या अहमदनगर जिल्ह्यात एकल व अनाथ बालकांची संख्या 7 हजार 930 बालकांवर पोहोचली आहे. बाल संगोपन योजनेची रक्कम दरमहा 1100 रुपयांवरून 2500 रुपये करण्याची घोषणा 2022-23 च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मात्र त्याविषयी वित्त विभागानेच आक्षेप घेतल्याने याबाबतचा कोणताही आदेश गेल्या सहा महिन्यात निघाला नाही. याउलट दरमहा मिळणारे 1100 रुपये सुद्धा एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून गेल्या सहा महिन्यात मिळालेले नाहीत. त्यासाठी निधीच उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. याबाबत करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी महिला व बालविकास आयुक्तांना निवेदन देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचेही याकडे लक्ष वेधून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

याची दखल घेऊन वित्त विभागाने नुकताच महिला व बालविकास विभागास निधी उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांसाठी बालसंगोपन योजनेला 36 कोटी रुपयांचे अनुदान महिला व बालविकास विभागाने जिल्हानिहाय वितरित केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांच्या खात्यात हे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. दिवाळीच्या तोंडावर निधी उपलब्ध झाल्याने लाभार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दिवाळी आठवडाभरावर आली आहे.

त्यापूर्वीच आठवडाभरात हा बाल संगोपन निधी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा झाला तरच त्यांची दिवाळी गोड होऊ शकणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर हा निधी दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या