अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाण्याच्या टँकरची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील पाणीसाठा हा 28 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यात मराठवाड्यातील पाणी साठा 12 टक्क्यांवर आहे. नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरण खपाटीला आले असून या तीन धरणांत 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील 3 धरणे आणि सहा मध्यम प्रकल्प अशा 9 ठिकाणी अवघा 19.83 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
नगरसह राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे. पारा 40 अंशांच्या पुढे सरकला आहे. मागील पंधरवड्यात जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, त्याचे प्रमाण अल्प होते. त्यानंतर उन्हाचा चटका वाढल्याने दिवसेंदिवस नगरसह राज्यातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. राज्यातील धरणांमधील पाणी साठा हा 28 टक्क्यांपर्यंत खाली पोहोचला आहे. 20 एप्रिलला हा साठा 32 टक्के होता. रविवार 5 मे रोजी नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या मोठ्या प्रकल्पात (धरणात) 26.21 टक्के दर दक्षिणेतील मध्यम प्रकल्पात 16.63 टक्के असा जिल्ह्यात एकूण 19.83 टक्के पाणी शिल्लक आहे.
गेल्या महिनाभरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम सर्व स्तारात दिसत आहे. गतवर्षी याच कालावधीत राज्यातील पाणीसाठा हा 42 टक्क्यांवर होता. राज्यात सर्वात मोठे जलसंकट मराठवाड्यात असून त्याठिकाणी अवघा 16 टक्के जलसाठा शिल्लक आहे. राज्यात सध्या पाणी टंचाईच्या झळा लागत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या उन्हाबरोबर पाणी आणि चारा टंचाई वाढली आहे. अनेक धरणातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम होत आहे. राज्यातील प्रमुख 138 मोठ्या धरणांमध्ये सध्या 28 टक्केच पाणीासाठा राहिला आहे. दरम्यान, पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वणवण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान असणार्या भंडारदरा धरणात 2 हजार 861 दलघफू पाणी साठा असून टक्केवारी 25.92 टक्के, मुळा 8 हजार 218 दलघफू पाणी साठा असून टक्केवारी 31.61 टक्के, निळवंडे 1 हजार 757 दलघफू पाणी साठा असून टक्केवारी 21.12 टक्के आहे. या तिनही धरणाची उपलब्ध पाण्याची टक्केवारी 26.21 टक्के आहे. तर आढळा 509 दलघफू पाणी साठा असून टक्केवारी 48.2 टक्के, मांडओहळ 30 दलघफू पाणी साठा असून टक्केवारी 7.47 टक्के, घाटशिळ शुन्य टक्के, सीना 538 दलघफू पाणी साठा असून टक्केवारी 22.42 टक्के, खैरी 76 दलघफू पाणी साठा असून टक्केवारी 14.26 टक्के आणि विसापूर 69 दलघफू पाणी साठा असून टक्केवारी 7.67 टक्के आहे. दक्षिणेतील मध्यम प्रकल्पात 18.61 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील धरणे आणि मध्यम प्रकल्प मिळून 19.67 टक्के पाणी साठा शिल्लक आहे.
जायकवाडीत फक्त 7.74 टक्के साठा
वाढत्या उष्णतेमुळं पाण्याची मागणी वाढत आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्यात देखील झपाट्यानं घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या जायकवाडीत फक्त 7.74 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात निम्म्याहून अधिक धरणे भरलेली होती.