निळवंडेतून 1920 क्युसेकने विसर्ग
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा पाणलोटात अधूनमधून पाऊस बरसत असल्याने धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेतही काल सायंकाळी पाणीसाठा 8173 दलघफू झाला होता. या धरणातून 1920 क्युसेकने प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
भंडारदरा पाणलोटात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे रविवारी व्हॉल्वमधून 218 क्युसेक, स्पिलवेतूनही 609 क्युसेक आणि विद्युत गृह क्रमांक 1 मधून 820 क्यलसेक असा एकूण 1647 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
आढळा धरणातील पाणीसाठा पुन्हा 100 टक्के झाला असून 410 क्युसेकने ओव्हरफ्लो सुरू आहे. पाणलोटात पाऊस सुरू असल्याने भातपीके जोमात आहेत. तसेच पाणलोट सौंदर्याने नटला आहे. प्रवरा नदी वाहती झाल्याने लाभक्षेत्रातही समाधानाचे वातावरण आहे.
कुकडी पाणीसाठा 26000 दलघफू
पिंपळगाव जोगेतून विसर्ग सुरू
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने कुकडी प्रकल्पातील सर्वांत मोठे धरण असलेले डिंभे धरण शुक्रवारी दुपारी दुसर्यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच पिंपळगाव जोगेही 90 टक्के भरले आहे. पाण्याची आवक सुरूच असल्याने या धरणांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा 26000 दलघफूच्या पुढे सरकला आहे.
काल सकाळी संपलेल्या 24 तासांत सर्व धरणांमध्ये एकूण 570 दलघफू पाणी नव्याने आले. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा 25862 दलघफू (87.14 टक्के झाला होता. काल रात्री उशीरा या धरणांतील पाणीसाठा 26000 दलघफूच्या पुढे सरकला होता. गतवर्षी याच काळात या धरणातील पाणीसाठा 28145 दलघफू (95 टक्के) होता. 13500 दलघफू क्षमतेचे डिंभे भरले. एकूण क्षमता 8 टीएमसी असलेल्या धरणात आता 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणाच्या सांडव्यातून 750 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. याच धरणातील पाणीसाठा जुलैमध्ये मायनसमध्ये होता. वडजचा पाणीसाठा 97 टक्क्यांवर पुन्हा पोहचला आहे. माणिकडोहमध्ये 76 टक्के पाणी आहे. घोड धरणातही धिम्यागतीने पाणी वाढू लागले आहे.
मुळातील साठा 21500 वर
कोतूळ |वार्ताहर| Kotul
मुळा पाणलोटात पाऊस बरसत असल्याने धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 21349 दलघफू झाला होता. पाण्याची आवक पाहता आज सकाळपर्यंत या धरणातील पाणीसाठा 21500 दलघफूच्या पुढे सरकलेला असेल.
हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनईत पाऊस होत असल्याने मुळा नदीतील विसर्ग कमी अधिक होत आहे. काल रविवारी सकाळी कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 3212 क्युसेक होता. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने सायंकाळी नदीतील विसर्ग 1753 क्युसेकपर्यंत घटला होता. काल सायंकाळी संपलेल्या 36 तासांत या धरणात 849 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. कोतूळ येथे 17, मुळानगर येथे 78 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भातासह अन्य पिके जोमाने वाढू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.