अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
एकीकडे दुष्काळाचे सावट असणार्या नगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल रात्री ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. श्रीरामपूर, राहाता, अकोलेत रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. हा पाऊस ऊस, गहू, मकास तसेच चारा पिकांना लाभदायक आहे. तसेच आवर्तन नसल्याने अनेक पिकांना पाण्याची गरज होती. अशा पिकांना दिलासा मिळाला आहे. तर अनेक ठिकाणी कापूस भिजल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राहाता प्रतिनिधीने कळविले की, राहाता शहर व परिसर तसेच शिर्डी व तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष व पेरू संकटात येण्याची शक्यता आहे.
अकोले प्रतिनिधीने कळविले की, अकोले शहर व तालुक्यात पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तालुक्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत होता. नेवासा प्रतिनिधीने कळविला की, काल रात्री ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम सुरूपाचा तर काही ठिकाणी हलका पाऊस सुरू होता.
संगमनेर प्रतिनिधीने कळविले की, दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी रिमझीम सुरू होती. रात्री वाजल्यानंतर पावसाने काहीसा जोर धरला होता. रात्री उशीरापर्यंत काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता.
भंडारदरा, मुळा पाणलोटातही मुसळधार
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा आणि पाणलोटात काल रविवारी सकाळपासूनच अधूनमधून पावसास सुरूवात झाली. सायंकाळनंतर ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या लखलखाटात जोरदार पाऊस कोसळत होता.
काल सकाळी 7 वाजता हलकासा पाऊस सुरू झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण कायम होते. दुपारी तीन वाजता काही काळ जोरदार पाऊस झाला. भंडारदरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर सायंकाळनंतर वादळी वार्यासह पावसाचा पुन्हा जोर वाढला. घाटघरमध्ये भागात काही ठिकाणी गारपीटही झाली. पाऊस पडल्याने गारवा वाढला आहे. मुळा पाणलोटातील कोतूळ, हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनईत काल सायंकाळी 6 वाजेनंतर जोरदार पाऊस झाला. बोरी, वाघापूर येथेही मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याचेही वृत्त आहे.
पारनेरात वादळी पावसासह गारपीटीचाही तडाखा
पारनेर / अहमदनगर |प्रतिनिधी| Parner
एकीकडे दुष्काळाचे सावट असणार्या पारनेर तालुक्याला रविवारी दुपारनंतर वादळी वार्यासह आलेल्या आवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वार्यासह जोरदार हजेरी लावली. यावेळी तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना करत पिकवलेला कांदा, चारा पिके, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या.
दरम्यान, रविवारी दिवसभर नगर शहर आणि परिसारात ढगाळ वातावरण होते. पावसाळ्याप्रमाणे आभाळ भरून आले होते. दुपारी 4 च्या सुमारास अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या भूरभूर पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन गारठून गेले होते. दुसरीकडे पारनेर तालुक्यात शनिवारी रात्री हलक्या स्वरुपात पाऊस झाला. त्यानंतर रविवारी दुपारनंतर तालुक्यातील काही भागात जोरदार वादळी वारे वाहू लागले. अनेक भागात विजांचा कडकडाट झाला. तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी दुपारी तीन साडेतीननंतर पावसास सुरुवात झाली. यात अनेक ठिकाणी जोराच्या वार्यासह मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. यात द्राक्ष पिकासह कांदा पिकाचे सर्वधिक नुकसान झाले असुन तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडल्याची माहिती आली आहे.
तालुक्यातील जवळा, पानोली, राळेगण थेरपाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने द्राक्ष, केळी पिकासह इतर सर्वच शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. बहूतांश ठिकाणी ज्वारी, मका पिके भूईसपाट झाली. जवळा, निघोज, राळेगण थेरपाळ या बागायत पट्टात अनेक फळपिकाचे नुकसान झाले असुन तालुक्यातील अनेक भागात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासह पारनेर शहर परिसर, सुपा, वाडेगव्हाण अशा पश्चिम पट्ट्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे.
शिरूर, जामखेड तालुक्यात हजेरी
शिरूर तालुक्यातील अनेक गावांत रविवारी पहाटे तीन वाजता जोरदार वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. प्रामुख्याने, मांडवगण, तांदळी, पिंपळसूटी, कोळगाव डोळस, कुरूळी वडगाव या भागात पाऊस झाला. जामखेड तालुक्यातील नान्नजसह काही परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटाने श्रीरामपूरकर हादरले
श्रीरामपूर शहर व परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. प्रचंड ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे श्रीरामपूरकरांची तारांबळ उडाली. पंचवीस ते तीसवेळा विजांच्या जोरजोरात कडकडाटाने श्रीरामपूर परिसर हादरून गेला. वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पावसाळ्यात असा पाऊस झाला नाही. पण हिवाळ्यात जोरदार पाऊस झाला. बेलापूर, टाकळीभान, भोकर, खोकर, पढेगाव, उक्कलगाव, रांजणखोल, टिळकनगर, खंडाळा या ठिकाणी रात्री पाऊस सुरू होता.
भोकर वार्ताहराने कळविले की, भोकर, खोकर परिसरात दमदार पाऊस झाला. वीजपुरवठाही खंडित झाला होता. वडाळा महादेव वार्ताहराने कळविले की, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव तसेच निपाणी वडगाव शिरसगाव ब्राम्हणगाव वेताळ परीसरात अवकाळी पावसाचा तडाखा येथील परीसरात रात्री साडे सात ते सुमारे साडेआठ दरम्यान चांगलाच पाऊस तसेच विजेचा गडगडाट झाला असुन यावेळी बराच वेळ विजेचा लपंडाव सुरु होता. यावेळी परीसरात गारवा वाढला असुन नागरीकांना अनेक असाध्य आजाराला सामोरे जाण्याची वेळ येणार असल्याचे दिसत आहे.
राहुरीतही दणका
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यात काल रात्री सर्वदूर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने विजेच्या कडकडासह हजेरी लावली. रात्री उशीरा मुसळधार पाऊस सुरू होता.
काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यातील बारागावनांदूर, वांबोरी, देवळाली प्रवरा, तांभेरे, गुहा, टाकळीमिया, राहुरी स्टेशन, आरडगाव, वळण, मांजरी, वांबोरी, उंबरे, ब्राम्हणी आदी परिसरात अवकाळी पावसाचे आगमन झाले. त्यानंतर विजेच्या कडकडाटासह रात्री 9 वाजल्यापासून मध्यम स्वरूपात पाऊस सुरू होता. रात्री 9.45 वाजेनंतर मुसळधार पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या व लागवडींना विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने कांदा रोपावर करपा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोपरगावातही जोरदार
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव तालुक्यासह शहरामध्ये काल रविवार दि 26 नोव्हेंबर रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सूर्यनारायणाने साधे दर्शनही दिले नाही. मात्र रविवारी सायंकाळपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
नोव्हेंबर महिना संपत आला असूनही अद्याप थंडीचा म्हणावा तसा ‘फिल’ आलेला नाही. सध्या बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळेहवामान विभागाने राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता. त्यानुसार कोपरगाव तालुक्यात रविवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील ब्राह्मणगाव, टाकळी, कोळपेवाडी, सुरेगाव, पोहेगाव, कोकमठाण, कानेगाव, वारी, शिरसगाव, उकडगाव, करंजी, पढेगाव सह कोपरगाव शहरात रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावत एकच नागरिकांचे तारांबळ उडवली असून या पावसामुळे शेतकर्यांच्या चिंता वाढल्या आहेत.