Saturday, July 27, 2024
Homeनगरजिल्ह्यात खरिपासाठी 75 टक्के पेरणी

जिल्ह्यात खरिपासाठी 75 टक्के पेरणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लांबलेला पाऊस यामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या संथगतीने सुरू होत्या. चालू आठवड्यात जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी 75 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली असून खरिपासाठी पेरणी करण्याचा कालावधी दोन दिवसांनी संपणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी असून यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

- Advertisement -

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात काही प्रमाणात जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होताना दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 75 टक्क्यांच्या जवळपास पेरण्या झालेल्या असून यात ऊस लागवड सोडून झालेल्या पिकांच्या पेरणीची टक्केवारी ही 84.75 टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 91 हजार क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात अकोले तालुक्यात 2 हजार 940 हेक्टवर भाताची लागवड (17 टक्के), खरीप ज्वारी 35 हेक्टर (6 टक्के), 60 हजार 18 हेक्टर बाजरी (40 टक्के), 56 हजार 868 हेक्टर मका (94 टक्के), 45 हजार 637 हेक्टर तूर (126 टक्के), 16 हजार 127 हेक्टर (34 टक्के), 35 हजार 27 हेक्टर उडिद (87 टक्के), 3 हजार 955 हेक्टर भुईमूग (51.72 टक्के), 59.5 हेक्टर तीळ (42.62 टक्के), 197 हेक्टर सुर्यफूल (38 टक्के), 1 लाख 34 हजार 911 हेक्टर सोयाबीन (154. 48 टक्के), 1 लाख 31 हजार 247 हेक्टर कापूस (107 टक्के) अशी लागवड झालेली आहे. यासह 13 हजार 915 हेक्टवर नवीन उसाची लागवड झालेली असून त्याची टक्केवारी 14.7 टक्के आहे.

यंदा जिल्ह्यात खरिपाची पेरणी संथ गती होती. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाने सर्वांना मेटाकुटीला आणलेले असताना जिल्ह्यात वरूणराजाने पाठ फिरवली होती. यामुळे पेरण्यांना वेग नव्हता. जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पावसाने शेतकर्‍यांनी पिकांची पेरणी केली होती. मात्र, पाऊस गायब असल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट होते. दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसाचे आगमन झाले असून यामुळे खरीप हंगामातील पिकांना अनेक ठिकाणी नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप हंगामातील पिकांची स्थिती सुधारणार आहे.

नगरमध्ये दमदार हजेरी

गुरूवारी नगरमध्ये दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या दमदार पावसाने हजेरी लावली. यावेळी सुमारे अडीच ते तीन तास पाऊस बरसत होता. या पावसामुळे पहिल्यांदा शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. या पावसामुळे शहर परिसारातील गावांना चांगला फायदा होणार आहे. कालचा पाऊस जिल्ह्यातील बहुतांश भागात झाला असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, काल पहिल्यांदा नगर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पहिल्याच दमदार पावसाने पुन्हा नगर पालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पाडले. दुपारी दोनच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात पाऊस पडत होता. गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या