अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मागील वर्षी लसीकरणामुळे कमी झालेला जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा जिल्ह्यात वाढू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात 239 गावात 1 हजार 174 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यातील 19 जनावरे गंभीर अवस्थेत असून 53 जनावरांचा मृत्यू झाला. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढते आहे. शेतकर्यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरू केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्यावर्षी लम्पी आजाराचा मोठा प्रादुर्भाव आढळला होता. त्यामुळे जनावरांची वाहतूक तसेच जनावरांचा बाजार बंद करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती. लम्पीमुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होते. गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लम्पीचा सर्वाधिक प्रादुर्भाव जाणवला होता. पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजनांमुळे नंतर हे प्रमाण घटत गेले. गेल्या मे 2023 मध्ये जिल्ह्यात केवळ 4 जनावरांना लागण झालेली आढळली होती.
परंतु पावसाळा सुरू झाला तसा, 15 जूननंतर लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढता वाढू लागला आहे. पावसाळ्यात कीटक, चिलटे, डास माशांचे प्रमाण वाढू लागले तसे जनावरातील लम्पीचा आजार बळावत चालला. गेल्या वर्षी ज्या भागात कमी लागण झालेली आढळली त्या भागात यंदा प्रादुर्भाव वाढलेला आढळत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात 239 गावात लम्पीचा प्रादुर्भाव असून कोपरगाव 29, कर्जत 5, नगर 3, नेवासा 38, पारनेर 3, पाथर्डी 32, राहाता 11, शेवगाव 57, श्रीरामपूर 12, श्रीगोंदा 17, राहुरी 32 गावात बाधित जनावरे आहे.
तालुकानिहाय लम्पीचे रुग्ण
कोपरगाव 183, नगर 7, कर्जत 19, नेवासा 18, पारनेर 15, पाथर्डी 134, राहाता 22, राहुरी 269, शेवगाव 279, श्रीगोंदा 67, श्रीरामपूर 35 असे आहेत.