अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
लसीकरणापासून वंचित राहिलेली बालके आणि गरोदर मातांसाठी आज सोमवार (दि.7) विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राज्यात राबविली जात आहे. नगर जिल्ह्यातही पुढील तीन महिने ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
लसीकरणाचे प्रमाण 90 टक्केच्या पुढे वाढावे हे विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 या मोहिमेचे आहे. जिल्ह्यातया मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी 2 आगस्टला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यबल गटाची सभा घेण्यात आली. जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयं सेविका यांचे प्रशिक्षण तसेच पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली व मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले.
ही मोहीम 3 फेर्यांमध्ये घेण्यात येणार आहे. 7 ते 16 ऑगस्ट 2023 रोजी पहिली फेरी, 11 ते 16 सप्टेंबर 2023 दुसरी फेरी, 9 ते 14 ऑक्टोबर 2023 रोजी तिसरी फेरी होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज असून जिल्ह्यातील सर्व 0 ते 2 वर्ष व 2 ते 5 वयोगटातील बालकांचे आणि गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. स्थलांतरित मजूर, लोकवस्ती, वीट भट्टी, बांधकाम मजूर, दुर्गम भाग लोकवस्ती हे भाग यासाठी प्राधान्य असणार आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणाविना वंचित राहू नये, तसेच लसीकरणाअभावी बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी आता आरोग्य विभाग मार्फत म यू विन पफ चा वापर करत बालकांची लसीकरण नोंदणी केली जाणार आहे.
या अॅपमुळे बालकांचे लसीकरण सोपे झाले असून 0 ते 18 वयोगटातील तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना देण्यात येणार्या लसीकरणाची माहितीही एका क्लिकवर मिळणार आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आता मयू विन अॅपफ वर नोंद केल्यानंतर बालकांचे लसीकरण होणार आहे. या अॅप मुळे इतर जिल्हयांत किंवा राज्यांत लस घेणे शक्य होणार आहे. काही कामासाठी स्थलांतरित असेल किंवा जिल्हयातील अनेक स्तलांतरित कुटुंबियांसाठी या अॅपच्या माध्यमातून ते ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात असतील तेथील लसीकरणाची वेळ पाहून तेथे बालकाला लसीकरण करण्यात येणार आहे.
यामुळे लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याची गरज नाही, त्या मोबईलवरील मेसेजद्वारे समजू शकणार आहेत. तसेच लसीकरण लाभार्थ्याचे आशा, एएनएम व एमपीडब्ल्यूसुद्धा पूर्व नोंदणी करू शकणार आहेत. लसीकरण केंद्रावर लसीकरणा दिवशी ही नोंदणी करता येणार आहे. ही अभियान यशस्वी करण्याच आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी केले आहे.