Friday, November 1, 2024
Homeनगरआता जिल्हा 'अहिल्यानगर'; महसूल व वन विभागाकडून अधिसूचना जारी

आता जिल्हा ‘अहिल्यानगर’; महसूल व वन विभागाकडून अधिसूचना जारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य सरकारने अहमदनगर शहरापाठोपाठ आता जिल्ह्याचेही नामांतर अहिल्यानगर असे केले आहे. या संदर्भात महसूल व वन विभागाने मंगळवारी अधिसूचना प्रसिध्द केली. यामध्ये जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर केल्याचे तसेच उपविभागाचे अहिल्यानगर, अहमदनगर तालुक्याचे अहिल्यानगर व अहमदनगर गावाचे अहिल्यानगर असे नामांतर केल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, महापालिकेने केलेले नामांतर पुसून टाकण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या विरोधात आंदोलन केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड) येथील जयंतीच्या कार्यक्रमात नगरचे नामांतर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 4 ऑक्टोबर 2024 रोजी अहमदनगर शहराचे अहिल्यानगर असे नामांतर केल्याची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली. हे केवळ नगर शहराचे नामांतर झाले, जिल्ह्याचे नाही. अशा काही प्रतिक्रिया व्यक्त करत संभ्रमावस्था निर्माण करण्यात आली होती. त्यानंतर आता महसूल व वन विभागाने अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर केल्याचे तसेच उपविभागाचे अहिल्यानगर, अहमदनगर तालुक्याचे अहिल्यानगर व अहमदनगर गावाचे अहिल्यानगर असे नामांतर केल्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यातून संभ्रम दूर केल्याचे मानले जाते.

दरम्यान, शहराचे अहिल्यानगर असे नामांतर केल्याची आधिसूचना जारी केल्यानंतर मनपाने लगेच जुन्या प्रशासकीय इमारतीवर व अग्निशमन केंद्रावर अहिल्यानगर असे नाव कोरले. परंतु सोमवारी रात्री ते पुसण्यात आले. हा प्रकार बुधवारी लक्षात आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मनपामध्ये आयुक्तांच्या विरोधात आंदोलन केले. यासंदर्भात बोलताना दिगंबर गेंट्याल यांनी सांगितले की, काहींच्या तक्रारीला घाबरून आयुक्तांनी राज्य सरकारचा आदेश असूनही नामांतराचा फलक पुसण्याचे आदेश दिले. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी डांगे यांनी नामांतराच्या फलकावर डाग पडले असल्याने ते पुसण्यात आले. पुन्हा नामांतराचा फलक लावला जाईल, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ऐतिहासिक घटना – ना.विखे

जिल्हा नामांतराच्या बाबतीत महायुती सरकारने वचनपूर्ती केली आहे. अहिल्यादेवीचे स्मारकही उभे करू, असा विश्वास महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाला तिनशे वर्ष यंदा पूर्ण होत असताना जिल्ह्याल पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जिल्ह्याला देता आले ही ऐतिहासिक घटना आहे. नामांतराची सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांनी आभार व्यक्त केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या