Thursday, September 19, 2024
Homeनगरआषाढ अखेर जिल्ह्यात सरासरीच्या 72 टक्के पाऊस

आषाढ अखेर जिल्ह्यात सरासरीच्या 72 टक्के पाऊस

नेवासा, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहात्याची टक्केवारी अवघी 50 ते 55 टक्के

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

यंदा जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी पांडूरंग पावल्याचे चित्र आहे. आषाढ महिन्यांचा अंतिम टप्पा सुरू झाला असून 4 ऑगस्टला आषाढी अमावस्या (गटारी) आहे. त्याआधीच नगर जिल्ह्यातील दहा तालुक्यात जून ते सप्टेंबरमध्ये पडणार्‍या पावसाच्या सरासरी 71.6 टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगाम जोमात आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील नेवासा, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यावर वरूणराजा रूसल्याचे चित्र आहे. याठिकाणी सरासरी अवघा 50 ते 55 टक्केच पाऊस झालेला आहे.

नगर जिल्हा परतीच्या पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात सुरूवातीचा पाऊस कमी असल्याचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. मात्र, यंदा जिल्ह्याच्या दक्षिण भागात जूनपासून धोधो पाऊस बरसत आहे. यामुळे या भागातील अनेक तालुक्यात सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतांना दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यांत सरासरी 322 मि.मी. पावसाची नोंद झालेली असून याची टक्केवारी 71.6 टक्के आहे. यात जून महिन्यांत सरासरीच्या 177.3 मि.मी. पाऊस झालेला असून त्याची सरासरी 164 टक्के होती. तर जुलै महिन्यांत आतापर्यंत 142.6 मि.मी. पाऊस झालेला असून त्याची सरासरी टक्केवारी 168.9 टक्के आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत 448.1 मि.मी पाऊस दरवर्षी होतो. त्यापैकी आतापर्यंत 320.7 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी या तालुक्यात 98 ते 105 टक्के पावसाची नोंद झालेली आहे. यासह जामखेड, पारनेर, अकोले, नगर आणि संगमनेर तालुक्यात पावसाचे प्रमाण 60 ते 82 टक्के आहे. उर्वरित तालुक्यापैकी नेवासा, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता याठिकाणी 50 ते 55 टक्के पाऊस झालेला आहे.

सर्वाधिक श्रीगोंदा
जिल्ह्यात पावसाळ्याच्या पहिल्या पाणे दोन महिन्यांत श्रीगोंदा तालुक्यात सरासरीच्या 105 टक्के पाऊस झालेला आहे. यासह कर्जत तालुक्यात 98 टक्के, पाथर्डीत 94 टक्के, जामखेड 82 टक्के तर पारनेर तालुक्यात 82 टक्के पाऊस झालेला आहे.

तालुकानिहाय सरासरी
नगर 69.9, पारनेर 81.7, श्रीगोंदा 105, कर्जत 98, जामखेड 82.2, शेवगाव 63.8, पाथर्डी 94.6, नेवासा 55.3, राहुरी 52.2, संगमनेर 69.3, अकोले 71.4, कोपरगाव 55.8, श्रीरामपूर 48.3, राहाता 50.8 एकूण 71.6 टक्के पाऊस आतापर्यंत झालेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या