Tuesday, July 23, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात सर्वदूर आषाढ सरी

नगर जिल्ह्यात सर्वदूर आषाढ सरी

अकोले, श्रीरामपूर आणि संगमनेरात रिपरिपः जामखेड, पाथर्डीत ढगफुटीसदृष्य पाऊस

श्रीरामपूर, संगमनेर, अकोले |प्रतिनिधी| Shrirampur| Sangamner| Akole

- Advertisement -

श्रीरामपूर, संगनमेर, अकोले शहर व परिसरात काल मंगळवारी काही ठिकाणी रिपरिप तसेच काही ठिकाणी आषाढ सरींनी जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जिवदान मिळाले आहे. श्रीरामपूर शहर व परिसरात सकाळपासूनच ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. पण सायंकाळी 7 वाजेपासून रिपरिप सुरू झाली ती रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरू होती. रात्री 7 वाजण्याच्या सुमारास रिपरिप सुरू होती.

नंतर आषाढ सरींनी जोर पकडला होता. तसेच या पावसामुळे शहरातील तळघरातील दुकानांमध्ये पाणी घुसले होते. हे पाणी करण्यासाठी या दुकानदारांना मोठी कसरत करावी लागली. त्यात वीज गायब झाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. संगमनेरातील घारगाव, बोटा भागात दुपारी आषाढ सरी जोरदार बरसल्या होत्या. त्यानंतर रात्री शहर व तालुक्याच्या काही भागात संततधार सुरू होती. अकोले शहरासह तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. राहुरी, कोपरगाव, राहात्याच्या काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळला. या पावसामुळे कपाशी, सोयबीनची पिके तरारली आहेत. मका, ऊस आणि अन्य पिकांनाही हा पाऊस फायदेशीर आहे.

जामखेड, पाथर्डीत ढगफुटीसदृष्य पाऊस

अहमदनगर/पाथर्डी/ जामखेड |प्रतिनिधी| Ahmednagar| Pathardi| Jamkhed

सोमवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळा आणि ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीत कमालीची वाढ झाला असून जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणार्‍या एकूण पावसाच्या 48 टक्के पाऊस हा 10 पर्यंत कोसळा आहे. पावसाचे हे प्रमाण दक्षिण जिल्ह्यातील तालुक्यात आहे. दरम्यान, सोमवारी रात्री पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्यांच्या पहिल्या दिवसापासून यंदा जिल्ह्यात टप्प्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेष करून हे प्रमाण जामखेड, कर्जत, पाथर्डी, पारनेर, नगर, श्रीगोंदा यासह दक्षिण जिल्ह्यात अधिक आहे. तर उत्तरेतील अनेक तालुक्यात पावसाने प्रमाण कमी असल्याने त्यांचा खरीप हंगामाच्या पेरण्यावर होतांना दिसत आहे. दरम्यान, गेल्या 15 ते 20 दिवसांच्या खंडानंतर सोमवारपासून नगर शहर आणि दक्षिण जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाऊस होतांना दिसत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याच्या घटना वाढत असून रात्रीतून ओढे, नाले आणि तलाव तुडूंब भरून पाण्याचे नदी आणि अन्य प्रवाह वाहते झाले आहेत. सोमवारी रात्री जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी मंडळात झालेली आहे. याठिकाणी काही तासात 117 मि.मी. पाऊस झाला आहे. यासह जामखेड तालुक्यातील तीन महसूल मंडळात 90 ते 93 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. कर्जतच्या मिरजगावमध्ये देखील 80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी सायंकाळी नगर तालुक्यात आणि शहराच्या काही भागात तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाची पेरणी 96 टक्क्यांच्या पुढे सरकली आहे. पाथर्डीच्या तालुका प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनूसार सोमवारी शहरासह परिसरात रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. अखेर पावसाला मुहूर्त लागून सोमवारी रात्री उशिरापर्यंत कमी जास्त प्रमाणात पावसाने चांगली बॅटिंग केली. सुमारे तीन तासांपेक्षा अधिक चांगला पाऊस सुरू होता. माणिकदौंडी, मोहरी, मोहटादेवी, तारकेश्वरगड, कुत्तरवाडीचा तलाव या डोंगर परिसरामध्ये पाऊस झाल्याने रात्रीतून शिरसाटवाडी येथील दोन तलाव भरले तर मोहरीचा तलाव हा चाळीस टक्के भरला असून कुत्तरवाडीचा तलाव 90 टक्के भरला आहे. झालेल्या पावसामुळे नदी, नाले पाण्याने ओसंडून वाहत आहे. ओढे, नाले, छोटी तलावे त्याचप्रमाणे बंधारे गच्च भरून सांडव्याद्वारे पाणी बाहेर पडत आहे.

बराच कालावधीनंतर तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून सर्वत्र समाधानकारक वातावरण पसरले आहे. पाऊस काळाच्या सुरुवातीपासून तालुक्यात चांगला पाऊस बरसला. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. विश्रांतीनंतर पडलेला पावसाने नदी, नाले तलाव व बंधारे भरून निघाले आहेत. पाथर्डी शहरात सोमवारी झालेल्या पावसाने सकल भागात सर्वत्र पाणी साचले होते. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे व्यवसायिकांना दुकानावरून घरी जाण्यासाठी मोठी प्रतिक्षा करावा लागली. शहरात चांगला पाऊस झाल्याने दुचाकी व पायी जाणार्‍या नागरिकांना बराच काळ अडकून बसावे लागेल. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात सर्व दूर तालुक्यात पाऊस सोमवारी रात्री बरसला.

सकाळपासून वातावरणामध्ये उकडा निर्माण झाले होते.खर्डे, दूलेचांदगाव, साकेगाव माळी, बाभुळगाव,धामणगाव, मढी, शिरसाटवाडी, रांजणी, केळवंडी, हंडाळवाडी, कारेगाव, मोहटा, करोडी, भिलवडे, अकोले, पालवेवाडी, मोहज देवढे तसेच माणिकदौंडी परिसरात चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात एकूण सहा मंडळात सोमवारी झालेला पाऊस यामध्ये पाथर्डी 74.5, माणिकदौंडी 117, टाकळीमानुर 66.3, कोरडगाव 17.5, करंजी 38, मिरी 21.8 मिलिमीटर पाऊस पडला आहे. आजपर्यंत पावसाळ्यात झालेला एकूण पाऊस हा पाथर्डी 213, माणिकदौंडी 218, टाकळीमानुर 261,कोरडगाव 209, करंजी 343, मिरी 249 असा सहा मंडळात एकुण पाऊस काळात पाऊस झाला आहे.

जामखेड येथील प्रतिनिधींने दिलेल्या माहितीनूसार तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून यात जून ते 9 जुलैअखेर तालुक्यात 353 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. आतपर्यंत पावसाची सरासरी ही 208.9 टक्के झाली सोमवारी तालुक्यात झालेल्या पावसात जामखेड महसूल मंडळात 93.5 मि.मी., अरणगाव 43.5 मि. मी., खर्डा 92.5 मि. मी., नान्नज 62 मि.मी. आणि नायगाव 93.5 मि.मी. असा पाऊस झालेला आहे. यासह दक्षिणेतील अन्य तालुक्यात दमदार पाऊस बसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या