Friday, September 20, 2024
Homeनगरनगरसह 21 जिल्ह्यांत पुढील आठ दिवस पाऊस

नगरसह 21 जिल्ह्यांत पुढील आठ दिवस पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

3 ते 10 सप्टेंबरपर्यंत आठवडाभर खान्देश, विदर्भ आणि नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 21 जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. दरम्यान, उद्या गुरुवारी 5 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून यामुळे राज्यात सप्टेंबरमधील पावसाच्या आवर्तनासाठी पूरक ठरणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

चंद्रपूरजवळ केंद्रित अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकल्यामुळे आज बुधवारपासून मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होईल. तेथे केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ, हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता आहे. तर हिंगोली, जालना, व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यात बुधवार दि .4 ते मंगळवार 10 सप्टेंबरपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचा मुख्य आस काहीसा दक्षिणेकडे सरकलला आहे. अरबी समुद्रात संपूर्ण पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर ऑफ-शोअर ट्रफची उपस्थिती आहे. तसेच अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून दिड किमी उंचीपर्यंत ताशी 48 किमी वेगाचे येणारे आर्द्रता युक्त पश्चिमी वारे, वेग कमी होवून प्रत्यक्षात ताशी 20-25 किमी वेगाने मुंबई किनारपट्टीवर आदळत आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामातून मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात मंगळवार 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत आठवडाभर अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भ- मध्यम ते जोरदार पाऊस राहणार असून 10 सप्टेंबरपर्यंत आठवडाभर खांदेश, विदर्भ आणि नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या 21 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही कायमच आहे.

सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोर पाहता आठवडाभर धरणांतून होत असलेला जलविसर्ग असाच टिकून राहू शकतो किंवा त्यात अधिक वाढही होवू शकते. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूर-परिस्थितीची शक्यता ही कायम राहिल. विदर्भ वगळता महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा 4 डिग्रीने खालावून 28 डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे. तर पहाटेचे किमान तापमानही सध्या सरासरीइतके म्हणजे 22 डिग्री से. ग्रेडच्या आसपास जाणवते आहे. कमाल व किमान अश्या दोन्ही तापमानातील फरक कमी कमी होत तो 6 डिग्री से.ग्रेड पर्यन्त खालावला आहे. त्यामुळे सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारीही सरासरीपेक्षा वाढतीकडे झेपावत आहे. प्रचंड अश्या या होणार्‍या आर्द्रतेच्या उपलब्धतेतून आणि फक्त कमाल तापमानातील विशेष अश्या घसरणीमुळे, येथे-तेथे पडणार्‍या उष्णता संवहनी प्रक्रियेच्या पावसास सध्याचे वातावरण मारक ठरून, व्यापक क्षेत्र कव्हर करणार्‍या मान्सूनच्या पावसाला पूरक ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तश्याच प्रकारचा व्यापक क्षेत्र कव्हर करणारा दमदार पावसाचा लाभ होत असल्याचे खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या