Sunday, June 30, 2024
Homeनगरजिल्ह्यात 46 हजार 434 क्विंटल बियाणाचा पुरवठा

जिल्ह्यात 46 हजार 434 क्विंटल बियाणाचा पुरवठा

शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 6 लाख 75 हजार क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. हंगमासाठी कृषी विभागाने 84 हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवली होती. मात्र, त्यापैकी 46 हजार 434 क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले असून अद्याप जवळपास निम्मे बियाणे उपलब्ध होणे बाकी आहे. त्यातच पाऊस यंदा वेळे आधी सुरू झाला असून यामुळे शेतकर्‍यांचे बियाणाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यात 15 जून ते 15 ऑगस्ट हा खरीप हंगाम पेरणीचा कालावधी असून, जिल्ह्याच्या भौगोलिक रचना आणि पडणार्‍या पावसानुसार खरीप हंगामासाठी पिके घेण्यात येतात. यात दक्षिण जिल्ह्यात प्रामुख्याने कडधान्य पिकांचा अधिक समावेश आहे. दुसरीकडे अकोले आणि पारनेर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत नगदी पीक म्हणून ओळख असणार्‍या सोयाबीन, कपाशीचे

पीक घेण्यात येते. यासह तूर पिकाचे क्षेत्र देखील काही वर्षापासून वाढतांना दिसत आहे. नगर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात खरिपाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. यात कपाशी आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असून, या दोन पिकांमुळे हंगामात शेतकर्‍या चांगला दाम मिळत आहे. मात्र, ही दोन्ही पिके पावसावर अवलंबून आहेत. दोन वर्षापूर्वी सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी ही पिके पाण्यात सडून गेली होती. उत्तर नगर जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन आणि बाजरी पीक अधिक प्रमाणात घेण्यात येते. यासह चारा पिकांसोबत मका पिकाचे प्रमाण जास्त असते. नगर आणि पारनेर तालुक्यात मूग, कर्जतमध्ये 20 टक्के आणि जामखेडमध्ये 80 टक्के असे जवळपास 100 टक्के उडिदाचे पीक घेण्यात येते.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र हे 5 लाख 79 हजार 768 हेक्टर असून, मागील वर्षी प्रत्यक्षात झालेली पेरणी ही 6 लाख 72 हजार होती. यंदा यात काहीशी वाढ वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाची सरासरी बियाणे विक्री ही 51 हजार 579 क्विंटल आहे. यंदा मात्र बियाणांची मागणी जास्त नोंदवण्यात आली आहे. यंदा हंगामासाठी 83 हजार 597 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून यात सर्वाधिक 49 हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे आणि 2 हजार 555 क्विंटल कपाशी बियाणे यांचा समावेश आहे. यापैकी 46 हजार 434 क्विंटल बियाणांचा पुरवठा झालेला असून उर्वरित बियाणे पुढील आठ दिवसात पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले. वेळेत बियाणे पुरवठा न झाल्यास त्याचा शेतकर्‍यांना फटका बसणार आहे.

कपाशीच्या बियाणाला मोठी मागणी
जिल्ह्यात यंदा कपाशी पिकाची लागवड वाढणार असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात कपाशी बियाणांच्या वेगवेगळ्या वाणाच्या 5 लाख 98 हजार पाकिटांची मागणी कृषी विभागाने बियाणे कंपनीकडे नोंदवलेली आहे. यापैकी लाख 98 हजार पाकिटे म्हणजेच 99 टक्के कपाशी बियाणाच्या पाकिटांचा पुरवठा झालेला आहे. मात्र, असे असतांना देखील जिल्ह्यात कपाशी बियाणांचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या