अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडत आहेत. आंदोलनकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्वच बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने बुधवारी घेतला. मंगळवारपर्यंत काही ठिकाणी बससेवा सुरू होती. मात्र बुधवारी पुर्णपणे बससेवा बंद करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातून शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी येणार्या, तसेच परगावी जाणार्या प्रवाशांची गैरसोय झाली. याशिवाय सध्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा तसेच राज्यातील काही भागांत एसटीवर दगडफेक करण्यात आली. काही ठिकाणी महामार्गावर आंदोलन सुरू असल्याने एसटीच्या फेर्या करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी केवळ बीड जिल्ह्यात जाणार्या फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यानंतरही अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याने अहमदनगर विभागीय कार्यालयाने मंगळवारी बहुतांश ठिकाणच्या फेर्या रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, अद्याप आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने बुधवारीही बस बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. बससेवा बंद असलेल्या संधीचा फायदा खासगी वाहतुकदारांनी उठवला आहे. त्यांच्याकडून अवाच्या सव्वा भाडे आकारून नागरिकांची लुट करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्याने बीड, सोलापूर जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात पाठविलेल्या बस पुन्हा त्या जिल्ह्यात गेल्या नाही. तोडफोड व जाळपोळ होण्याची शक्यता असल्याने बीड, सोलापूर या जिल्ह्यांतील सुमारे 50 बस तारकपूर आगारातच अडकून पडल्या आहेत.