अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी टंचाई जाणवू लागल्याने मध्यंतरी बंद करण्यात आलेला टँकरचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यात चार टँकरने पाच गावे व 47 वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. सव्वा महिन्यापूर्वीच जिल्हा टँकरमुक्त झाला होता. मात्र पुन्हा टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. येत्या काही दिवसातच टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, टँकर सुरू करण्याचे जिल्हाधिकार्यांकडे असलेले अधिकार पुन्हा प्रांताधिकार्यांकडे सोपवण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी, सन 2018 च्या टंचाईमध्ये नोव्हेंबर महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. त्यानंतर आता यंदा नोव्हेंबरमध्ये पुन्हा टँकर सुरू करावे लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्यावर्षी 17 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. यंदा त्यामध्ये वाढ होणार आहे.
जिल्ह्यात यंदाच्या जून ते सप्टेंबर दरम्यान 91 टक्के पर्जन्यमान झाले. हा पाऊस अनेक दिवसांचा खंड पडून झाल्याने त्याचा पिकांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी फारसा उपयोग झालेला नाही. शिवाय काही तालुक्यात तर अल्प पर्जन्यमान झालेले आहे. अकोले तालुक्यातील अधिकच्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी वाढलेली जाणवते.
गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने 15 एप्रिलनंतर टँकर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ आली होती. त्यावेळी संगमनेर तालुक्यात प्रथम टँकर सुरू करण्यात आले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक म्हणजेच 94 टँकरव्दारे 48 गावे 258 वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. सप्टेंबरमध्येच 21 दिवस पावसाचा खंड पडला. शिवाय यंदा मान्सूनचे दिरंगाईने आगमन झाले होते. परिणामी खरीपाच्या उत्पादकतेत किमान 50 टक्के घट झाल्याचा अंदाज कृषी खात्याकडून व्यक्त केला जात आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यातील टँकर संख्या 54 वर घसरली होती. गणेशोत्सव दरम्यान झालेल्या पावसाने जिल्ह्यातील टँकरची संख्या आणखी घटली व 30 सप्टेंबरला जिल्हा टँकरमुक्त झाला होता. मात्र अवघ्या 35 दिवसातच जिल्ह्यात पुन्हा टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात प्रथम पाथर्डीतून तालुक्यातील पाच गावे व 47 वाड्यावस्त्यांना शनिवारपासून (दि. 4) टँकर सुरू करावे लागले आहेत. तेथे चार टँकरमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच ही संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.