अकोले |प्रतिनिधी| Akole
अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्यक्ष सिंचनासाठी वापरात असलेल्या एकूण अंदाजे 32 मोठे, मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पांचा एकूण पाणीसाठा अंदाजे 55.30 टीएमसी इतका असून आजमितीस जिल्ह्यातील प्रमुख 12 धरणांमध्ये एकूण सुमारे 40.77 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असल्याची माहिती इंजि. हरिश्चंद्र चकोर (से.नि.जलसंपदा विभाग) यांनी दिली आहे.
इंजि. चकोर सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख 12 धरणांमध्ये भंडारदरा, मुळा व निळवंडे या मोठ्या धरणांचा समावेश होत असून मध्यम प्रकल्प प्रकारामध्ये आढळा, सीना, मांडओहोळ, खैरी, घाटशीळ पारगाव व विसापूरसह पिंपळगाव खांड या धरणांचा समावेश होतो.सद्यस्थितीमध्ये भंडारदरा, निळवंडे व मुळा या मोठ्या धरणांमध्ये (सरासरी 87%) समाधानकारकरित्या पाणीसाठा झालेला असून आढळा मध्यम प्रकल्पात देखील सरासरी 85% पर्यंत झालेला पाणीसाठा ही लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गात निश्चितपणे समाधानाची बाब आहे परंतु दक्षिण नगर जिल्ह्यातील सीना, खैरी, प्रकल्पासहित असलेले चार(4) मध्यम प्रकल्प व घोड धरणातील पाणीसाठा (2.35 टीएमसी 40%)अतिशय कमी आहे.व तसेच मांडओहोळ धरणात देखील अत्यंत कमी पाणीसाठा(8%) व भोजापुर धरणात (232 द.ल.घ.फु.= 65%) इतका पाणीसाठा दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थिती पाहता लाभ क्षेत्रात निश्चितच चिंतेचे वातावरण निर्माण होण्यास वाव आहे.
भंडारदरा धरणात जुन 2023 अखेर सुमारे 48.80 %, निळवंडे धरणात 21%, मुळा धरणात 33 % व आढळा धरणात सुमारे 50.66 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला होता, त्यामुळे नव्याने जी पाण्याची आवक नेहमीप्रमाणे अपेक्षित असते ती या वर्षीच्या पावसाळ्यात झालेली नसून पाणलोटक्षेत्रात देखील पावसाचे सरासरी प्रमाण निश्चितच कमी झालेले आहे. भंडारदरा व मुळा धरणांचे पाणलोट क्षेत्रातील कोकणकडा घाट माथ्यावरील घाटघर येथील पर्जन्यमान गतवर्षीपेक्षा सुमारे 880 मिलिमीटरने कमी झालेले दिसून येत आहे. त्यामुळे आज पावेतो भंडारदरा व निळवंडे धरणांमधुन देखील ओव्हरफ्लोचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले नाही.
जिल्ह्यातील पावसाचे सध्याचे प्रमाण पाहता यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेले पीक वाया जाण्याची, पिण्याच्या पाण्याची व चारा टंचाईची भीती देखील शेतकर्यांमध्ये दिसून येत आहे. मात्र अजूनही पावसाळ्याचा एक ते दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असून परतीच्या (रिटर्न रेन्स)पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडून भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल असा गेल्या काही वर्षांचा अनुभव असल्याचे इंजि. हरिश्चंद्र चकोर , सेवा निवृत्त अभियंता, जलसंपदा विभाग, संगमनेर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. व तसेच घाटमाथ्यावरून कोकणात वाहुन जाणारे अतिरिक्त 115 टीएमसी पाणी पूर्वेकडे गोदावरी खोर्यात वळविण्याच्यादृष्टीने विचाराधीन असलेली योजना शासनाने युद्ध पातळीवर राबविण्याची आवश्यकता देखील इंजि.चकोर यांनी अधोरेखित केली.