संदीप जाधव | 9225320946
एखादी संकल्पना यशस्वीपणे केवळ पूर्ण करायची असेल तर त्यासाठी मेहनत, जिद्द लागतेच. मात्र, ती संकल्पना दर्जेदारपणे साकारायची असेल तर कष्टाला योग्य कल्पकतेचीही साथ लागते. या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर काम फत्तेच! गुरुवारी राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या नाटकात ही कल्पकता पाहायला मिळाली. स्पर्धेत सादर झालेल्या ‘म्हातारा पाऊस’ या दोन अंकी नाट्यकृतीने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः चिंब केले. अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघाने सादर केलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन कृष्णा वाळके यांनी केले. कथानक फुलविण्यास कलाकारांची अदाकारी कारणीभूत ठरली. प्रत्येक कलाकारासाठी दिग्दर्शकाने चांगली मेहनत घेतल्याचे दिसले.
एका गरीब वयोवृद्ध जोडप्याभोवती सर्व कथानक फिरते. या दोघांच्याही जीवनात पावसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्नादिवशीच परतीच्या प्रवासात बरसलेला पाऊस या दोघांनाही कायम आठवतो. पावसात घर गळत असतानाही ते पावसाला दोष देत नाहीत. नोकरीसाठी परगावी राहत असलेच्या त्यांच्या मुलाला म्हणजेच कैलासला आई-वडिलांसाठी अजिबात वेळ नाही. त्याची खंत हे जोडपे बाळगून असतात. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगाना पाऊस साक्षीदार असतो. आपल्या गायीविषयी असलेली प्रेम त्यांच्या काळजीत दिसत असते. आहे त्या स्थितीत हे दाम्पत्य सुखात जगत असते. गावाकडे कधी न येणारा त्यांचा मुलगा येतो तेव्हा त्यांचे घर जळत असते. या भावनिक प्रसंगाने नाटकाचा शेवट होतो.
ग्रामीण ढंगाच्या भाषेतील संवाद, साजेसे नेपथ्य आणि कलाकारांनी रंगमंचावर दाखविलेली अभिनयाची चुणूक यामुळे कथानकाला प्रभावीपणे सादर करण्यात कृष्णा वाळके या उमद्या दिग्दर्शकाला कोणतीही अडचण आली नाही. म्हातार्याची भूमिका योगीराज मोटे यांनी केली. गावरान संवाद त्यांनी उत्तमपणे सादर केले. त्यांच्या चेहर्यावरील प्रेमळ, समाधानी आणि व्याकूळ भाव त्यांना छान जमले. म्हातारीची भूमिका प्रिया तेलतुंबडे यांनी केली. वृद्धत्वाची विशिष्ट लकब त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. त्यांच्या भावनिक अभिनयाला आत्मविश्वासू देहबोलीची सुंदर साथ मिळाली. रंगमंचावरील त्यांचा वावरही अगदी सहज होता. त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या टाळ्यांनी उचलून धरली.
गोपाला या निसर्गप्रेमी तरुणाला प्रतीक अंधुरे याने साकारले. त्याचाही अभिनय अगदी कसलेला वाटला. दोन-तीन प्रसंगात आलेल्या गोपालाने नाटकात चांगलाच रंग भरला.
कैलास या पात्राला अथर्व धर्माधिकारी याने निभावले. त्याच्या वाट्याला जास्त भूमिका आली नाही. मात्र, आलेले प्रसंग त्याने व्यवस्थित हाताळले. सुरेखा हे पात्र रेणुका ठोकळे हिने केले. नवरदेवाची भूमिका विशाल शेळके याने केली. त्याच्या संवादातही दम होता. नवरीला तनुजा नरमाळे हिने सादर केले. अंशाबापूला ऋषी सकट याने शिवराळ भाषेत रंगमंचावर आणले. त्याच्या वाट्याला एकच प्रसंग आला. त्यानेही प्रेक्षकांना हसवले. मामाची भूमिका पवन पोटे याने केली. मिळालेल्या संधीत त्याने छान अभिनय केला. याशिवाय नाटकात असणार्या आरती गवळी, शिफाली आंबेकर, वैष्णवी गट्टूवार, प्रिती शिंदे, सार्थक रेखी या मुलींनीही चांगलीच धमाल उडवून दिली. धीटपणा आणि सकारात्मक देहबोली यामुळे त्यांचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला.
नेपथ्याची जबाबदारी विशाल शेळके, अथर्व धर्माधिकारी यांच्याकडे होती. शेतकर्याच्या घरावरील गवर्या, गोठा आणि त्याशेजारी असलेल्या इतर वस्तू अगदी समर्पक होत्या. पाऊसही त्यांनी छान पाडला. या नेपथ्यासाठी त्यांची कल्पकता कामी आली. प्रकाश योजना पवन पोटे, दीपक शिंदे यांच्याकडे होती. विविध प्रसंगानुरूप त्यांनी छान स्पॉट दिले. संगीत देण्याची जबाबदारी शुभम घोडके यांनी उत्तमरित्या पार पाडली. प्रसंगानंतर त्याला दिलेला संदर्भीत संगीत परिणामकारक वाटले.
रंगभूषा व वेशभूषेची जबाबदारी रेणुका ठोकळे, अथर्व धर्माधिकारी यांनी पेलली. म्हातारा-म्हातारी, नवरा-नवरदेव, अनशाबापू आणि मुली या सर्वांची वेशभूषा अगदी साजेशी होती. टोपीवाला मामाही त्यांनी भारीच रंगवला. अंतिम टप्प्यात असलेल्या या स्पर्धेत दिग्दर्शक वाकळे यांनी कमालाची उत्सूकता निर्माण केली आहे. कलाकारांना त्यांची भूमिका नीट समजावून देत ती दर्जेदारपणे करवून घेण्यात दिग्दर्शक कुठेही कमी पडले नाहीत. नगरच्या स्पर्धेतील आजपर्यंतच्या इतिहासात रंगमंचावर पाऊस पाडण्याचा प्रयोग बहुधा पहिलाच असावा. या ‘म्हातार्या पावसाने’ रंगमंचाला तर भिजवलेच मात्र रसिक प्रेक्षकांनाही चिंब केले.